अमेरिकेत क्रूड तेलाचा भाव शून्य डॉलरच्या खाली


फोटो साभार जागरण
अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच क्रूड तेलाचा भाव शून्य डॉलर प्रती बॅरलच्या खाली घसरून -१.४३ डॉलरवर गेला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर करोना महामारीचा काय परिणाम होतो आहे याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे. सोमवारी अमेरिकन बाजारात युएस क्रूड ओईल फ्युचर्सनुसार वेस्ट टेक्सास इंटरमिडीएट ( डब्ल्यूटीआय) क्रूडची किंमत प्रती बॅरल १८ डॉलरवरून घसरून शून्य डॉलरच्या खाली गेली. बेंट क्रूड ही २६.३३ डॉलर्स प्रती बॅरल वर घसरले.

भारत गेली दोन वर्षे अमेरिकेकडून क्रूड खरेदी करत आहे मात्र आता किमती कोसळल्या असल्या तरी नवी खरेदी केली जात नसल्याचे सांगितले जात आहे. यामागे खरेदी केलेले क्रूड ठेवायचे तर तेव्हडी साठवण क्षमता आपल्याकडे नाही असे समजते. अर्थात केवळ भारतातच नाही तर जगातील अन्य देशांचीही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे किमती उतरल्या तरी आंतरराष्ट्रीय बाजारातून क्रूड खरेदी केली जात नाही.

कोविडच्या जगभरातील प्रसारामुळे लागू कराव्या लागलेल्या लॉकडाऊन मुळे सुमारे २०० कोटी जनता घरात बंद आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनाचे प्रमाण ६० टक्के कमी झाले आहे. विमान, रेल्वे सेवा बंद आहेत आणि उद्योग कारखानेही बंद असल्याने इंधनाला मागणी नाही. या परिस्थितीत अमेरिकेतील एक जरी तेलं कंपनी दिवाळखोरीत गेली तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा भीषण परिणाम होईल असे मत अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत.

Leave a Comment