पैशांची समस्या आहे ?, लॉकडाऊन दरम्यान अशी मिळवा ओव्हरड्राफ्टची सुविधा

लॉकडाऊनमुळे अनेकांच्या खात्यातील रक्कम संपली असून, पैशांची अडचण निर्माण झाली आहे. अशा स्थितीत बँकेकडून ओव्हरड्राफ्टची सुविधा घेता येते.

सरकारी आणि खाजगी बँका ओव्हरड्राफ्टची सुविधा देतात. हे एकप्रकारे बँकेकडून पैसे घेण्यासारखेच आहे. अनेक बँका चालू खाते, बचत खाते आणि जमा ठेवीवर (एफडी) ही सुविधा देतात. काही बँका शेअर्स, बाँड आणि विमा पॉलिसीवर देखील ओव्हरड्राफ्टची सुविधा देतात. याद्वारे तुम्ही बँकेकडून आवश्यक ते पैसे घेऊ शकता व नंतर परत करू शकता.

ओव्हरड्राफ्टची सुविधा –

जर बँकेत सॅलेरी अथवा चालू खाते असल्यास ही सुविधा घेणे सोपे जाते. एफडी नसेल तर त्या जागी एखादी वस्तू गहाण ठेवावी लागेल. अनेक बँका आपल्या चांगल्या ग्राहकांना ही सुविधा आधीच देत असतात.

किती पैसे ओव्हरड्राफ्टमधून काढता येतात ?

आरबीआयच्या नियमानुसार, चालू खातेधारक आणि कॅश क्रेडिट खातेधारक कमाल 50 हजार रुपये प्रत्येक आठवड्याला ओव्हरड्राफ्ट म्हणून काढू शकतात. सर्व बँका या सुविधेसाठी ग्राहकांकडून वार्षिक शुल्क देखील घेतात.

कोणत्या खात्यावर किती ओव्हरड्राफ्ट ?

सॅलेरी अकाउंटवर पगाराच्या अर्धे तर कोणाला पगाराच्या तीन पटपर्यंत ओव्हरड्राफ्ट मिळतो. जनधन खात्यांना देखील ही सुविधा मिळते. हे खातेधारक 5 हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट घेऊ शकतात. मात्र मागील 6 महिन्यात व्यवहार झालेले असणे आवश्यक आहे. ग्राहकांना टाइम डिपॉजिट अकाउंटवर देखील ओव्हरड्राफ्ट मिळतो. यात टर्म डिपॉजिटची पावती, आरडी या गोष्टी बँक स्वतः जवळ ठेवते.

कोणत्या आधारावर मिळते ही सुविधा ?

ग्राहकांच्या खात्यातील व्यवहारांचा इतिहास पाहून ही सुविधा दिली जाते. ग्राहकांचा क्रेडिट व्यवहार कसा आहे, हे लक्षात घेतले जाते. ओव्हरड्राफ्टच्या रक्कमेवर बँक व्याज आणि परत फेडीचा कालावधी निश्चित करत असते. ग्राहकांचा क्रेडिट स्कोर आणि रिपेमेंट हिस्ट्री महत्त्वाची ठरते.

ओव्हरड्राफ्टचे फायदे काय ?

ओव्हरड्राफ्ट क्रेडिट कार्ड अथवा इतर खाजगी कर्जाच्या तुलनेत स्वस्त आहे. यात कमी व्याज भरावे लागते. खाजगी लोनमध्ये तुम्हाला प्रोसेसिंग चार्ज व इतर खर्च देखील येतो. मात्र यात तसे होत नाही.

Leave a Comment