काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना बुलढाण्याच्या सूपुत्राला वीरमरण


नवी दिल्ली : शनिवारी दहशतवाद्यांशी काश्मीरच्या सोपोर परिसरात लढताना बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावचे सूपुत्र चंद्रकांत भगवंतराव भाकरे यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात आईवडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. गेल्या १५ वर्षांपासून चंद्रकांत भाकरे केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) कार्यरत होते. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच पातुर्डा गावावर शोककळा पसरली आहे.

शनिवारी सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांचे एक पथक जम्मू-काश्मीरच्या सोपोर परिसरात गस्त घालत होते. दहशतवाद्यांनी त्यावेळी त्यांच्यावर हल्ला चढवत बेछुट गोळीबार केला. चंद्रकांत भाकरे, राजीव शर्मा (बिहार) आणि सत्यपाल सिंह (गुजरात) हे तीन जवान यामध्ये शहीद झाले. तर आणखी दोन जवान जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी एसडीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. सध्या या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी नूरबाग परिसरात शोध मोहीम राबवण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच भारतीय लष्कराने काही दिवसांपूर्वीच पाकव्याप्त काश्मीरच्या दुधनियाल परिसरातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. गेल्या काही काळापासून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यासाठी या तळाचा सातत्याने वापर केला जात होता. तर १ एप्रिल रोजी केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाच दहशतवाद्यांनाही भारतीय जवानांनी कंठस्नान घातले होते.

Leave a Comment