येथे महिला वापरत आहेत नैसर्गिक कडूनिंब मास्क


फोटो साभार खास खबर
निसर्गासोबत राहणाऱ्या आदिवासींनी कोविड १९ च्या साथीमध्ये निसर्गावर विश्वास ठेऊन नैसर्गिक मास्क वापरास प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. झारखंड राज्याचा बहुतेक भाग जंगलांनी व्यापलेला आहे आणि येथे आदिवासी जनसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. देवघर मध्ये आदिवासी महिला शेतात काम करताना हे कडूनिंबाचे मास्क वापरत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

या आदिवासींचे जगणे नेहमीच निसर्गपूरक राहिले आहे आणि निसर्ग देव त्यांचे रक्षण करतो अशी त्यांची गाढ श्रद्धा आहे. कडूनिंब हा अतिशय गुणकारी आणि औषधी वृक्ष असून त्याची पाने कीटाणूनाशक आहेत. देवघर मधील जिल्हा प्रशासन प्रत्येक व्यक्ती पर्यंत मास्क पोहोचावेत यासाठी प्रयत्नशील आहेच पण त्या मदतीची वाट न पाहता येथील महिला कडूनिंबाची पाने नाकाभोवती बांधून मास्क प्रमाणे वापरत आहेत. सध्या येथे गहू कापणी आणि शेतीची अन्य कामे सुरु आहेत. मात्र या शेतकरी महिला सोशल डीस्टन्सिंगचे पालन करून कामे करण्यावर भर देत असल्याचे दिसून आले आहे.

कडूनिंब पानाचे मास्क या महीला स्वतःच तयार करत असून कुटुंबातील सर्वाना वापरायला देत आहेत. कोविड १९ पासून संरक्षणासाठी हे मास्क किती उपयुक्त हे सांगता येत नसले तरी त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती नक्की वाढते असे म्हणता येईल. विशेष म्हणजे हे मास्क बनवायला खर्च येत नाही आणि रोज नवीन मास्क करता येतो.

Leave a Comment