तबलिगींवरुन जावेद अख्तर आणि अशोक पंडित यांच्यात रंगला कलगीतुरा


जगभरासह देशात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींवरुन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करत असतात. त्यांनी यावेळीदेखील ट्विटरच्या माध्यमातून बृन्मुंबई महानगरपालिकेचे आभार मानले. महानगरपालिकेकडून प्रत्येक व्यक्तीच्या होत असलेल्या कोरोना चाचणीबाबत त्यांनी आभार मानले होते. पण चित्रपट निर्माते अशोक पंडित यांना त्यांचे हे ट्विट फारसे पचनी पडले नसून जावेद अख्तर यांच्यावर त्यांनी टिकास्त्र डागले आहे. अशोक पंडित यांनी त्यांना सर, तबलिगींवर तुम्ही कधी व्यक्त व्हाल?’ असा खोचक सवाल विचारल्यामुळे या दोघांमध्ये सध्या ट्विटरवरच कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.


देशातील लॉकडाउनचा कालावधी कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी वाढविण्यात आला आहे. त्याचबरोबर देशातील प्रत्येक नागरिकाला घरात राहण्याचे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यामध्ये दिवस-रात्र काम करत असून महानगर पालिकेकडून प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी करत असल्यामुळे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी बृन्मुंबई महानगरपालिकेचे ( बीएमसी) ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले. पण त्यांचे ट्विट पाहिल्यानंतर अख्तर यांना बॉलिवूड चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी टोला लगावला आहे. अशोक पंडित यांनी टोला लगावल्यानंतर जावेद अख्तर यांनीदेखील त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

जावेद अख्तर यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करत मुंबई महानगर पालिकेचे आभार मानले होते. मुंबई महानगर पालिकेला माझा सलाम. महानगर पालिकेमुळे आपल्या येथे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना चाचणी करण्यात आली आहे. प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात येत असल्यामुळे कोरोना रुग्णांची माहितीही तात्काळ मिळत आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्ण आढळल्यानंतर त्याला लगेचच उपचारासाठी पाठविण्यात येत असल्यामुळे कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी महानगर पालिकेचे हे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असून त्यांचे मनपूर्वक धन्यवाद, असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले होते.


अशोक पंडित यांनी त्यांचं हे ट्विट पाहून त्यांना खोचक सवाल विचारत, अजूनपर्यंत तबलिगींवर ट्विट का केले नाही? असा प्रश्न विचारला आहे. सर, महानगर पालिकेकडून करण्यात येत असलेल्या कार्याची तुम्ही प्रशंसा केली यांचे मला कौतूक आहे. पण, तबलिगींचे काय? मी वाट पाहत आहे, त्यांच्यावर तुम्ही कधी व्यक्त व्हाल. मला खात्री आहे तुम्ही मुराबादमध्ये जे घडले त्याचे व्हिडीओ वगैरे पाहिले असतील. पण अशा प्रकरणात तुम्ही शांत कसे काय?, असा सवाल अशोक पंडित यांनी विचारला.

जावेद अख्तर यांनीही अशोक पंडित यांनी विचारलेल्या प्रश्नावर रोखठोक उत्तर दिले आहे. अशोक जी, जे काही आहे ते उघडपणे बोला. तुम्ही मला कित्येक वर्षांपासून ओळखता, तुम्हाला असे वाटते मी सांप्रदायिक आहे? अन्य कोणी विचारले असते तर गोष्ट वेगळी होती. पण तुम्ही माझे मित्र आहात. तुम्हाला ठाऊक नाही का?, तबलिगी असो किंवा त्याप्रमाणे अन्य कोणतीही हिंदू किंवा मुस्लीम संस्थांविषयी माझे काय मत आहे, असे जावेद अख्तर म्हणाले.


अशोक पंडित यांनीही जावेद अख्तर यांचा पलटवार पाहून उत्तर देत, सर मी तुम्हाला ओळखतो आणि मनापासून तुमचा आदरही करतो.त्यामुळेच या गोष्टीमुळे संभ्रमात पडलो होतो. जे काही तबलिगी जमातीने केले, त्यावर तुम्ही जाहीरपणे व्यक्त झाला नाहीत. जर काही चुकीचे घडत असेल तर त्याविरोधात आवाज उठवणे ही शिकवण तुमच्याकडूनच मिळाली आहे. पण या लोकांनी जे काही केले त्यावर तुम्ही मौन बाळगले याची खंत वाटते.

Leave a Comment