कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेची आयपीएलसंर्दभात बीसीसीआयला ऑफर


नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 13 व्या हंगामाचे यजमानपद भूषवण्याची ऑफर बीसीसीआयला दिली आहे. कोरोनामुळे जगातील सर्वात आकर्षक टी -20 लीग भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे.यासंदर्भातील वृत्त आजतक या वृत्तवाहिनीने दिले आहे.

2020 च्या आयपीएल हंगामाला 29 मार्चपासून सुरूवात होणार होती. कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे 15 एप्रिलपर्यंत पहिल्यांदा स्पर्धा स्थगित करण्यात आली आणि आता 3 मेपर्यंत भारतात देशव्यापी लॉकडाऊन वाढविल्यानंतर ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.

दरम्यान, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने भारतीय बोर्डाला पत्र लिहिले आहे, ज्यात त्यांनी आयपीएलचे आयोजन करण्याची ऑफर दिली आहे. श्रीलंकेच्या बोर्डाच्या प्रमुखांचा असा विश्‍वास आहे की, भारताआधी श्रीलंका सर्वात आधी कोरोनापासून मुक्त होईल.

ईएसपीएनक्रिकइन्फोने एसएलसीचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांचा हवाला देत म्हटले आहे की, आयपीएल रद्द झाल्यामुळे बीसीसीआय आणि त्याच्या भागधारकांचे 500 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान होईल. अशा परिस्थितीत दुसर्‍या देशात स्पर्धेचे आयोजन करून तोटा कमी केला जाऊ शकतो. ते म्हणाले, जर स्पर्धेचे आयोजन श्रीलंकेत केले गेले तर भारतीय दर्शकांना टीव्हीवर हा खेळ पाहणे सोपे होईल. भारतीय मंडळाकडे दक्षिण आफ्रिकेत आयपीएल आयोजित करण्याचा अनुभव आहे.

आतापर्यंत दोनदा आयपीएल भारताबाहेर खेळवण्यात आला आहे. 2009 साली आयपीएल लोकसभा निवडणुकीमुळे दक्षिण आफ्रिकेत खेळविण्यात आली होती. यानंतर 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी युएईमध्ये आयपीएलच्या पहिल्या दोन आठवड्यांचे आयोजनही करण्यात आले होते.

Leave a Comment