रामराज्य ! रस्त्यावर पडलेल्या नोटा उचलण्याची झाली नाही कोणाचीच हिंमत

कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये एवढी भिती निर्माण झाली आहे की घराच्या बाहेर पडलेल्या 500 रुपयांच्या नोटा देखील उचलण्याची कोणी हिंमत केली नाही. दिल्ली येथे ही घटना घडली असून, अनेक मिनिटे लोक या नोटांकडे पाहत राहिले, मात्र कोणीही उचलण्याची हिंमत केली नाही. अखेर पोलिसांना बोलवण्यात आले.

उत्तर दिल्लीच्या लॉरेन्स रोड येथे दुपारच्या वेळेस घराबाहेर तीन नोटा पडल्या होत्या. अनेकजण त्या नोटांकडे पाहत होते, मात्र कोणाचीही नोटा उचलण्याची हिंमत होत नव्हती. अखेर कोणीतरी केशवपुरम पोलीस स्टेशनमध्ये फोन करत याची माहिती दिली.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र त्यांनीही कोणताही धोका पत्करला नाही. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही लोकांना घरात पाठवले. आमच्यातील एकाने हातमोजे घालत नोटा उचलल्या. त्याच्यानंतर नोटांवर सॅनिटायझर मारत त्यांना पाकिटात बंद करण्यात आले.

पोलिसांनी नोटांबाबत विचारणा केली, मात्र कोणीही या बाबत दावा केला नाही. ज्यांच्या घराच्या बाहेर नोटा पडल्या होत्या, त्यांनीही नोटा त्यांच्या असल्याचा दावा केला नाही.

पोलीस अधिकारी म्हणाले की, कोणीही रस्त्यावर पडलेले पैसे उचलले नाहीत. कोणीही दावा देखील केला नाही. रामराज्य असल्यासारखे वाटले.

मात्र नंतर एका महिलेने या नोटांसंबंधी दावा केला. पोलिस उपायुक्त (उत्तर-पश्चिम) विजयंता आर्या यांनी सांगितले. 49 वर्षीय चरणजीत कौर यांनी पोलीस स्टेशनमध्ये या नोटा त्यांच्या असल्याचा दावा केला. कौर या शाकूरपूर येथील सरकारी शाळेत शिक्षिका आहेत. त्यांनी एटीएममधून 10 हजार रुपये काढले होते, त्यातीलच या नोटा असल्याचे त्यांनी सांगितले.

नोंटावर व्हायरस असल्याच्या भितीने त्यांनी सॅनिटायझरद्वारे नोटा स्वच्छ करून बाल्कनीतील टेबलवर ठेवल्या होत्या. ज्या हवेने उडून गेल्या. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी महिलेला नोटा परत केल्या.

Leave a Comment