दहशतवादावरुन पाकिस्तानला भारतीय लष्कर प्रमुखांनी झापले


नवी दिल्ली – सर्व जग कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरससोबत युद्ध करत असतानाच सीमेवर सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांवरुन भारतीय लष्कराचे प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी पाकिस्तानला झापले आहे. भारत आणि संपूर्ण जग आज कोरोनासोबत युद्ध करत असताना पाकिस्तान मात्र दहशतवाद निर्यात करण्यात व्यस्त असल्याचे म्हणत नरवणे यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. आमच्या लोकांची मदत करण्यात आम्ही व्यस्त आहोत. आम्हाला फक्त आमच्या देशातील लोकांचीच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये वैद्यकीय मदत आणि औषधांचा पुरवठा करत मदतीचा हात देत आहोत. पण याच्या विपरित पाकिस्तान मात्र दहशतवाद निर्यात करत असून हे योग्य नसल्याचे लष्कर प्रमुखांनी म्हटले आहे.

जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे असून ते सीमारेषेवरील परिस्थितीचा आढावा घेत आहे. यावेळी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ते पुढे म्हणाले की, आज कोरोनाशी संपूर्ण जग आणि भारत लढा देत असताना आपला शेजारी देश अद्यापही आपल्याला त्रास देण्यात व्यस्त असून ही दुर्दैवी बाब आहे. गेल्या काही दिवसात सीमारेषेवर अनेकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे.

भारताने काही दिवसांपूर्वीच पाकव्याप्त काश्मीरमधील दुधनियाल परिसरातील दहशतवादी लाँचपॅडवर स्ट्राइक करत पाकिस्तानला चोख उत्तर दिले होते. भारतीय लष्कराकडून हे ऑपरेशन पाकिस्तानकडून केरन सेक्टरमध्ये वारंवार होणारा घुसखोरीचा प्रयत्न आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन यामुळेच करण्यात आले. १ एप्रिल रोजी भारतीय लष्कराने केरन सेक्टरमधून भारतात घुसखोरी करणाऱ्या पाच दहशतवाद्यांनी ठार केले होते. ज्या लाँचपॅडचा वापर या दहशतवाद्यांनी केला होता तेच भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त करण्यात आले.

आतापर्यंत भारतीय लष्करातील आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील दोन डॉक्टर आणि एक नर्सिंग असिस्टंट आहे. इतर चार रुग्ण उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. त्याचबरोबर एक जण लडाखमधील जवान असून तो पूर्ण बरा झाला असून पुन्हा कर्तव्यासाठी हजर झाल्याची माहिती यावेळी लष्कर प्रमुखांनी दिली. त्यांनी बोलताना सांगितले की, कोरोनाची लागण झालेल्यांच्या संपर्कात जे जवान आलेले नाहीत त्यांना युनिटमध्ये पुन्हा पाठवले जात आहे. जवानांसाठी दोन विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. बंगळुरु ते जम्मू आणि बंगळुरु ते गुवाहाटी या मार्गावर या दोन ट्रेन धावणार आहेत.

Leave a Comment