यंदा माउंट एव्हरेस्टही आयसोलेशन मध्ये


फोटो साभार ब्रिटानिका
मार्च एप्रिलचे दिवस म्हणजे जगातील सर्वोच्च शिखरावर म्हणजे माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी आसुसलेल्या गिर्यारोहकांच्या तुकड्यांचे दिवस. पण यंदा करोनानी येथेही लगाम लावला असून एकाही गिर्यारोहक एव्हरेस्ट बेस कॅम्पवर येऊ शकलेला नाही. त्यामुळे माउंट एव्हरेस्ट एकप्रकारे आयसोलेशन मध्ये गेल्याचे बोलले जात आहे. करोना प्रसारामुळे नेपाळ सरकारने एव्हरेस्ट सह सर्व गिर्यारोहण मोहिमा रद्द केल्या आहेत. २४ मार्च पासून काठमांडू ते लुम्बा हे एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत नेणारी उड्डाणे बंद केली गेली आहेत.

एव्हरेस्ट चढाई मोहिमांसाठी नेपाळ सरकार परमीट वाटप सुरु करण्याच्या अगोदर दोन दिवस देशात करोना मुळे लॉक डाऊन लागू केला गेला आणि गिर्यारोहणाच्या सर्व मोहिमा थांबविल्या गेल्या. प्रथमच एव्हरेस्ट मोहीमही रद्द झाली. नेपाळ मध्ये गेल्या अनेक वर्षात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा येथे विदेशी पर्यटक नाहीत. एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण रिकामा आहे.


नेपाळ सरकार दरवर्षी ७५ दिवसांची चढाई परमिट देते त्यातून सरकारला मोठा महसूल मिळतो. यंदा २० लाख पर्यटक येतील असा अंदाज केला जात होता म्हणजेच हॉटेल, एअर लाईन्स, प्रवास, ट्रेकिंग मोहिमा आणि खाणे पिणे यातून मिळणारे किमान ९००० कोटी रुपयांचे उत्पन्न बुडणार आहे. परिणामी ११ लाख नोकऱ्या संकटात आल्या आहेत. नेपाळ मधील शेर्पा वर्षातील या ७५ दिवसांची आतुरतेने प्रतीक्षा करतात कारण याच दिवसात ते वर्षाची कमाई करतात. आता हे शेर्पा शेतीकामाकडे वळले आहेत. करोना मुळे नेपाळ मधील सुमारे ३ हजार शेर्पांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

एव्हरेस्ट मोहिमातून नेपाळ सरकारला होणारी कमाई मोठी आहे. दरवर्षी सरासरी ४५ टीम येथे येतात. प्रती व्यक्ती येणारा खर्च साधारण ११ हजारादरम्यान असतो. एका टीम मध्ये १५ ते २० लॉलो असतात आणि दरवर्षी साधारण ६०० गिर्यारोहक येतात. नेपाळची लोकसंख्या ३ कोटी असून येथे करोनाची लागण झालेले ९ नागरिक मिळाले आहेत. मात्र एकही मृत्यू झालेला नाही.

Leave a Comment