यंदा मान्सून सरासरी इतका बरसणार


फोटो साभार स्कायमेट
देशात करोनाचे संकट उग्र रूप धारण करत असले तरी देशवासीय आणि शेतकरी बांधवांसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सून संदर्भातला पहिला अंदाज वर्तविला असून यंदा देशात समाधानकारक पाऊस बरसेल असे म्हटले आहे. मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सचे सचिव माधवन राजीव म्हणाले, यंदा देशात पावसाची सरासरी १०० टक्के असेल.

यंदा पावसाचे आगमन सुद्धा वेळेत होणार आहे. १ जूनला मान्सून केरळ मध्ये येईल आणि चेन्नई ४ जून, पणजी ७ जून, हैद्राबाद ९ जून, पुणे १० जून आणि मुंबई ११ जून असा हा प्रवास होईल असा अंदाज दिला गेला आहे. राजधानी दिल्लीत मान्सून २७ जून रोजी दाखल होईल.

मान्सूनचा अंदाज दोन टप्प्यात दिला जातो. पहिला अंदाज एप्रिल मध्ये तर दुसरा जून मध्ये दिला जातो. तांदूळ, ऊस, गहू, डाळी आणि अन्य अनेक पिके मान्सूनच्या आगमनावर अवलंबून असतात. देशात कृषी उत्पन्नाचा वाटा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या १५ टक्के आहे आणि त्यातून देशातील अर्ध्या जनतेला रोजगार मिळत असतो. ३० कोटी नागरिक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या व्यावसायाशी जोडलेले आहेत. त्यामुळे भारतासाठी मान्सून हा फार महत्वाचा आहे.

Leave a Comment