या खास मंदिरात शिवाजी महाराजांनी घेतले होते दर्शन


फोटो साभार हॉलीडीफाय
आंध्रच्या चितूर जिल्ह्यात कालहस्ती नावाच्या ठिकाणी भगवान शंकराचे एक खास मंदिर असून त्याला दक्षिण कैलास किंवा काशी असेही म्हटले जाते. पेन्नार नदीची उपनदी स्वर्णमुखीच्या काठावर हे भव्य मंदिर असून महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनीही या देवळात येऊन शंकर दर्शन घेतले होते असे सांगितले जाते. या मंदिराला राहू केतू मंदिर असेही नाव आहे. त्यामुळे राहू पूजा आणि शांती साठी या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येतात.

दक्षिणेतील पंचतत्व लिंगम मधील हे वायू लिंग मानले जाते. त्यामुळे पुजारीही या शिवलिंगाला स्पर्श करत नाहीत. मूर्ती जवळ सोन्याची पट्टी असून त्यालाच फुले, माळा घातल्या जातात. मंदिरातील पिंडीची उंची चार फुट असून पिंडीवर कोळी, नाग आणि हत्ती यांच्या प्रतिमा आहेत. मंदिराचा कळस दक्षिण्यात्य पद्धतीचा असून तीन सुंदर आणि भव्य गोपुरे आहेत. मंदिरातील १०० खांब असलेला मंडप स्थापत्य शास्त्राचा अप्रतिम नमुना मानला जातो. मंदिरात इतरत्र अनेक शिवलिंगे आहेत. भगवान कालहस्ती आणि देवी ज्ञानप्रसून अंबा यांच्या मुख्य प्रतिमा आहेत.


धनुर्धर अर्जुनाने कालहस्तीचे दर्शन घेतले होते असेही सांगितले जाते. मंदिरात तीन पशु मूर्ती आहेत. श्री म्हणजे कोळी, काल म्हणजे सर्प आणि हस्ती म्हणजे हत्ती. कोळ्याने शिवलिंगावर जाळे विणून तपस्या केली होती, सर्पाने पिंडीला विळखा घालून तपस्या केली होती आणि हत्तीने पिंडीवर जलाभिषेक करून उपासना केली होती अशी कथा सांगतात. या मंदिराचे उल्लेख स्कंद पुराण, शिव पुराण आणि लिंग पुराणात येतात. या मंदिरात दर्शन घेतले किं अन्य कोणत्याही मंदिरात न जाता थेट घरी परतायचे असते असा नियम आहे.

Leave a Comment