हे आहे देशातील एकमेव खासगी अभयारण्य


फोटो साभार नवभारत टाईम्स
भारतात नामशेष होऊ लागलेल्या वन्य जीवांच्या रक्षणासाठी अनेक अभयारण्ये विकसित केली गेली आहेत. अर्थात अशी अभयारण्ये सरकारी अखत्यारीखाली येतात. मात्र कर्नाटकाच्या पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी माउंटन रेंज मध्ये ३०० एकरात पसरलेले एक खासगी अभयारण्य ही आहे याची माहिती अनेकांना नसेल. ‘सेव्ह अॅनिमल्स इनीशीएटीव्ह’ उर्फ साई असे त्याचे नाव आहे. देशातील हे बहुदा पहिलेच आणि एकमेव खासगी अभयारण्य असून येथे सध्या ३०० विविध प्रकारचे वन्य प्राणी, पक्षी वस्तीला आहेत.

अनिल मल्होत्रा आणि त्यांची पत्नी पामेला यांच्या प्रयत्नातून हे अभयारण्य बहरले आहे. अनिल यांचा अमेरिकेत रियल इस्टेट आणि रेस्टोरंटचा व्यवसाय होता. १९६० मध्ये त्यांचा पामेला यांच्याबरोबर विवाह झाला आणि ते हवाईला हनिमून साठी गेले आणि तेथील निसर्गाने त्यांना इतकी भुरळ घातली की ते तेथेच स्थायिक झाले.

विशेष म्हणजे जागतिक तापमान वाढीमुळे जंगलांचे संरक्षण किती आवश्यक आहे याची जाणीव त्यांना तेथे झाली. दरम्यान अनिल यांच्या वडिलांचे १९८६ मध्ये निधन झाले तेव्हा ते हरिद्वार येथे अंत्यसंस्कारासाठी गेले तेव्हा गंगेची परिस्थिती पाहून त्यांना धक्काच बसला आणि आपण त्यासाठी काही करायला हवे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. अनिल यांनी उत्तरप्रदेशात मोकळी जागा मिळविण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. त्यांच्या मित्राने त्यांना कर्नाटकात जागा घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी कॉफी लागवडीमुळे बंजर बनलेली ५५ एकर जमीन प्रथम विकत घेतली.

त्यानंतर जवळचा असलेल्या झऱ्याजवळची मिळेल ती जमीन त्यांनी शेतकऱ्यांना चांगला मोबदला देऊन विकत घेतली. कीटकनाशकांच्या अति वापराने झऱ्याचे पाणी प्रदुषित झाले होते आणि जवळची जमीन नापीक बनली होती. ही जमीन खरेदी करण्यासाठी अनिल यांनी त्यांची हवाईची प्रॉपर्टी विकलीच पण आपले जंगल उभारणीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अपत्य न होऊ देण्याचा निर्णय घेतला. मग या जमिनीत अनिल आणि पामेला यांनी अनेक प्रकारच्या वनस्पती, झाडे लावली. त्यासाठी वन विभागाची मदत आणि सल्ला घेतला. आता त्यातूनच एक सुंदर जंगल तयार झाले असून हा जणू पृथ्वीवरील स्वर्ग बनला आहे.

Leave a Comment