स्विगी १२५ शहरात घरपोच देणार जीवनावश्यक वस्तू


फोटो साभार द वीक
ऑन लाईन फूड अँड अॅग्रीगेटर स्विगीने किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंची घरपोच डिलीव्हरी ग्राहकांना देण्याच्या सेवेचा विस्तार देशातील १२५ शहरांपर्यंत केला असून तशी घोषणा सोमवारी केली गेली. ही सेवा देण्यासाठी कंपनीने अनेक राष्ट्रीय ब्रांड तसेच स्थानिक होलसेल कंपन्यांशी करार केले असून तसे पत्रक जारी केले आहे.

या पत्रकानुसार स्विगीने हिंदुस्थान युनिलिव्हर, प्रोक्टर अँड गँबल, गोदरेज, डाबर, मेरीको, विशाल मेगा मार्ट, सिप्ला यासारख्या ब्रांडेड तसेच अनेक शहरातील स्थानिक स्टोर्स बरोबर करार केला आहे. स्विगीचे मुख्य अधिकारी विवेक सुंदर म्हणाले, आमच्या ग्राहकांना किराणा आणि जीवनावश्यक वस्तू पुरविणे हा आमच्या दीर्घकालीन धोरणाचा भाग होताच. करोना विरुद्धच्या लढतीत तो लवकर सुरु केला इतकेच. ग्राहकांनी जीवनावश्यक वस्तूंसाठी सुद्धा घराबाहेर पडू नये आणि त्यांना हव्या त्या वस्तू घरबसल्याच मिळाव्यात असा त्यामागे उद्देश आहे.

यामुळे लॉक डाऊनचे पालन करणे नागरिकांना सहज शक्य होणार आहेच त्याचबरोबर डिलीव्हरी देणाऱ्यांना अधिक कमाईची संधी मिळेल. आवश्यक सर्व वस्तू घरपोच येत आहेत म्हटल्यावर नागरिकांना लॉक डाऊनचे पालन करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे हाही या सेवेचा एक फायदा म्हणता येईल.

Leave a Comment