आता कॅशसाठी बाहेर पडण्याची गरज नाही, या बँकांनी सुरू केली खास सेवा

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी प्रत्येकाला घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे. बँका देखील आपल्या ग्राहकांना ऑनलाईन व्यवहार करण्यास सांगत आहे. याशिवाय ग्राहकांना समस्या येऊ नये यासाठी वेगवेगळ्या सुविधा देखील देत आहेत.

ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आयसीआयसीआय बँकेने एक खास सुविधा आपल्या ग्राहकांसाठी सुरू केली आहे. या सुविधेंतर्गत तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. आयसीआयसीआय बँक आता थेट मोबाईल एटीएम व्हॅनची सुविधा देत आहे.

या एटीएम व्हॅन काही विशिष्ट भागात उभ्या केल्या जातील. व्हॅन एटीएमची ही सुविधा सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत असेल. मोबाईल एटीएममध्ये सर्वसाधारण एटीएमप्रमाणे रक्कम तपासणे, पिन चेंज, फंड ट्रांसफर या सर्व सुविधा मिळतील.

आयसीआयसीआय बँकेच्या आधी एचडीएफसी बँकेने देखील आपल्या ग्राहकांसाठी मोबाईल एटीएमची सुरूवात केली आहे. हे मोबाईल एटीएम देखील एका विशिष्ट ठिकाणी, निश्चित कालावधीसाठी उभे केले जाईल. ज्याचा उपयोग ग्राहक करू शकतील.

या एटीएम कोठे असतील, याचा निर्णय संबधित शहरातील महानगरपालिकेशी चर्चा करून घेतला जाईल. या सुविधेमुळे ग्राहक पैसे काढण्यासाठी लांब जाण्याची गरज भासणार नाही.

Leave a Comment