लॉकडाऊन उठल्यावर असे झगमगले वुहान


फोटो साभार नवभारत टाईम्स
हुबेई प्रांतातील वुहान मध्ये कोविड १९ विषाणूचा पहिला संक्रमित सापडला आणि जगात सर्वप्रथम हेच शहर लॉक डाऊन केले गेले. ७६ दिवसांच्या लॉकडाऊन नंतर आता हे शहर पुन्हा नेहमीची गती पकडू लागले असून पुन्हा एकदा शहराचे वैभव रात्रीच्या अंधारात झगमगु लागले आहे. लॉक डाऊन उठवले गेल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून बुधवारी चीन सरकारी मिडीयाने मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर पडल्याचे फुटेज जारी केले आहे.

या फुटेज मध्ये नागरिक एखादा उत्सव साजरा करावा तश्या मूड मध्ये दिसले असून नॅशनल रेल्वे ऑपरेटरनी किमान ५५ हजार लोकांनी प्रवास केल्याचे जाहीर केले आहे. अर्थात शहरातील निर्बंध अजून पूर्ण उठविले गेलेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार घराबाहेर जाताना नागरिकांना अजून फोनवर सरकारी अॅप मध्ये पत्ता, जेथे जाणार त्या हॉटेलचे नाव, प्रवास आणि मेडिकल हिस्ट्रीची माहिती द्यावी लागते आहे. या नागरिकांपासून संक्रमणाचा धोका नाही याची खात्री केले जात आहे.

अजूनही शहरात करोना प्रसार नियंत्रण नियमांची कडक अंमलबजावणी केली जात असून गरज असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या जात आहेत. शाळा अजूनही बंद आहेत मात्र काही कारखान्यात कामगारवर्गाला कामावर बोलावले जाऊ लागले आहे.

Leave a Comment