लॉकडाऊन : आता एनपीएस खातेधारकांनाही काढता येणार पैसे

कोरोना व्हायरस संकटाच्या काळात लोकांना कोणत्या समस्येचा सामना करावा लागू नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. नागरिकांना या काळात पैशाची समस्या येऊ नये, यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. याशिवाय विविध खात्यांमधून पैसे काढण्याची परवानगी देखील देण्यात येत आहे.  पीपीएफ खात्यातून पैसे काढण्याची परवानगी दिल्यानंतर आता राष्ट्रीय पेंशन योजनेमधून (एनपीएस) देखील काही प्रमाणात रक्कम काढण्यास परवानगी दिली आहे.

याचा फायदा जवळपास 1.5 कोटी एनपीएस खातेधारकांना होणार आहे. पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणानुसार एनपीएस खातेधारकांना कोव्हिड-19 च्या उपचारासाठी काही प्रमाणात रक्कम काढता येईल.

पीएफआरडीएने राष्ट्रीय पेंशन योजनेच्या सर्व भागधारक आणि खातेधारकांसाठी जारी सर्क्युलरमध्ये सांगितले की, भारत सरकारने कोव्हिड-19 ला महामारी म्हणून घोषीत केले आहे. त्यामुळे एनपीएसच्या खातेधारकांना खात्यातून काही प्रमाणात रक्कम काढण्याची परवानगी दिली जात आहे.

पीएफआरडीएने सांगितले की, ही रक्कम गरज पडल्यास खातेधारक, जोडीदार, मुले, पालक यांच्या उपचारासाठी दिली जाईल. मात्र ही सुविधा अटल पेंशन योजनेच्या खातेधारकांसाठी नाही.

Leave a Comment