हँडशेकला कायमचा गुडबाय करा- संसर्गरोग तज्ञ अँथनी फॉस


फोटो साभार बिझिनेस जर्नल
केवळ करोना कोविड १९ पासून बचाव होण्यासाठी नव्हे तर अन्य संसर्गजन्य रोगांची लागण होऊ नये म्हणून युरोपीय देशातून परंपरागत चालत आलेल्या हँडशेक म्हणजे हस्तांदोलनाला कायमचा बाय बाय केला पाहिजे असा सल्ला संक्रामक रोगांचे तज्ञ आणि अमेरिकन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इंफेक्टीसाईड डिसीजचे संचालक अँथनी फॉस यांनी दिला आहे. जगभरात उत्पात माजाविलेल्या कोविड १९ ने अमेरिकेत सुमारे साडेचार लाख लोकांना संक्रमित केले आहे तर १४७९७ बळी घेतले आहेत.

अँथनी फॉस कोविड १९ एपिडेमिक मध्ये व्हाईट हाउस टास्क फोर्सचे प्रमुख म्हणूनही काम करत आहेत. ते म्हणाले आत्ता कोविड १९ ची साथ आहे म्हणून नव्हे तर अन्य विषाणूंचा फैलाव कमी व्हायला हवा असेल तर हस्तांदोलनाला कायमची तिलांजली द्यायला हवी. यामुळे जगभरात इन्फ्लूएन्झाच्या केसेस सुद्धा नक्कीच कमी होतील.

टाईम डॉट कॉमच्या बातमीनुसार फॉस म्हणाले, केवळ हस्तांदोलन टाळणे इतकेच पुरेसे नाही तर वारंवार हात धुण्याची सवय लावून घ्यायला हवी. तो आपल्या दिनचर्येचा भाग व्हायला हवा. त्यामुळेही अनेक आजारांचा फैलाव नियंत्रित होण्यास मदत मिळेल. हात न धुणे आणि वारंवार हस्तांदोलन यामुळे श्वास संबंधी आजारही एकाकडून दुसऱ्याकडे वेगाने पसरतात. विशेष म्हणजे करोनाचा फैलाव झाल्यापासून अनेक देशांचे नेते हँडशेक ऐवजी भारतीय नमस्तेला प्राधान्य देताना दिसत आहेत.. अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प सुद्धा त्या प्रयत्नांत आहेत असे समजते.

Leave a Comment