पुणे, मुंबईतील पाच कारागृहे लॉकडाऊन


फोटो साभार डीडब्ल्यू
महाराष्ट्रात करोना आजार उग्र रूप धारण करू लागल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहासह मुंबई आर्थर रोड, भायखळा, ठाणें आणि कल्याण येथील मोठी कारागृह लॉक डाऊन करण्याचा निर्णय राज्य गृहमंत्रालयाने घेतला आहे. राज्य कारागृह प्रमुख सुनील रामानंद यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रात विशेषतः मुंबई परिसर आणि पुण्यात करोनाचे अधिक संक्रमण दिसून येत असून दररोज कोविड १९ चा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढत आहे. राज्याच्या वरील कारागृहातून क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. या ठिकाणी कोविड १९ संसर्ग झाला तर त्यावर नियंत्रण मिळविणे अवघड होणार असल्याने या पूर्वीच या कारागृहातून ७ वर्षापेक्षा कमी शिक्षा झालेल्या ३००० कैद्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मात्र तरीही कारागृहातून अजून मोठ्या संखेने कैदी आहेत.

ही कारागृहे पूर्ण लॉकडाऊन केल्यामुळे आतून कुणीही बाहेर येऊ शकणार नाही तसेच बाहेरून कुणी आत येऊ शकणार नाही. तुरुंगात ठेवण्याची वेळ आल्यास पोलिसांना जवळच्या तुरुंगात आरोपी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. वरील मोठ्या कारागृहातील कर्मचारी संख्या कमी करायचा विचारही सुरु असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईतील काही भाग तसेच पुण्यातील काही भाग हॉटस्पॉट नक्की करून यापूर्वीच सील केले गेले आहेत.

Leave a Comment