बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी पुस्तके ‘पीडीएफ’ मध्ये उपलब्ध


पुणे : इयता बारावीची बदललेल्या अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके पीडीएफ स्वरूपात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे (बालभारती) अधिकृत संकेतस्तळावर बुधवारी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कोरोनामुळे मिळालेल्या सुट्टीच्या काळात ही पुस्तके डाऊनलोड करून विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करावी, असे आवाहन बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी केले आहे.

बालभारतीतर्फे बारावीच्या सर्व विषयांची पुस्तके तयार करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. बारावीची सर्व पुस्तके मार्च किंवा एप्रिल महिन्यात बाजारात उपलब्ध करून देण्याचा बालभारतीचा प्रयत्न होता. पण कोरोनामुळे गेल्या काही दिवसांत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बाजारातून नवीन पुस्तके विकत घेणे शक्य नसल्याने पीडीएफ स्वरूपात बालभारतीने पुस्तके उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिक्षक संघटनेकडून करण्यात आली होती. शासनाने त्यावर सकारात्मक भूमिका घेत सर्व पुस्तके पीडीएफमध्ये उपलब्ध करून दिली आहेत. यात बालभारतीची कला शाखेची पुस्तके मराठी तर विज्ञान शाखेची पुस्तके इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत.

Leave a Comment