लॉकडाऊन आणि हॉटस्पॉट सील मध्ये हा आहे फरक


फोटो साभार हिंदी न्यूज
देशात वेगाने हातपाय पसरत असलेल्या कोविड १९ च्या नियंत्रणासाठी २१ दिवसांचा लॉक डाऊन सुरु असूनही त्यावर नियंत्रण मिळविणे अवघड बनल्याने आता अनेक शहरात हॉटस्पॉट सील केले जात आहेत. अनेकांना लॉक डाऊन आणि हॉटस्पॉट सील मध्ये नक्की काय फरक आहे याची माहिती नाही. देशात उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, केरळ मध्ये करोना लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने या राज्यातील अनेक शहरे व काही ठिकाणी शहराचे काही भाग हॉटस्पॉट निश्चित करून सील केले गेले आहेत.

लॉक डाऊन हा जसा एक प्रकारच्या कर्फ्यू आहे तसाच हॉटस्पॉट सील हाही एक प्रकारचा अधिक कडक स्वरूपाचा कर्फ्यूच आहे. लॉक डाऊन काळात आवश्यकतेनुसार नागरिक घराबाहेर जाऊन जीवनावश्यक सामान, औषधे आणू शकतात. तसेच फळे, भाज्या, रेशन, दुध, औषधे या आपत्कालीन सेवा सुरु राहतात. मात्र विनाकारण उगीचच घराबाहेर पडायला कायद्याने बंदी असते.

हॉटस्पॉट सील करणे म्हणजे ज्या भागात रुग्ण संख्या वाढते आहे, अश्या भागातून कुणालाही बाहेर न येऊ देणे आणि बाहेरून कुणालाही आत जाऊ न देणे. यामुळे संसर्ग प्रमाणात राहतो. भाग सील केलेला असला म्हणजे कोणत्याही कारणाने लोक घराबाहेर पडू शकत नाहीत. वाहतूक बंद केली जाते आणि दुध, रेशन, अन्य सामानाची दुकाने बंद केली जातात. दारोदार जाऊन स्क्रीनिंग केले जाते, संशयित रुग्णांची सँपल्स घेतली जातात आणि जीवनावश्यक वस्तू घरपोच दिल्या जातात. हा भाग बाकी भागापासून पूर्ण वेगळा केला जातो. काही राज्यात पूर्ण शहरे सील केली गेली आहेत तर काही ठिकाणी काही ठराविक भाग सील केले गेले आहेत.

Leave a Comment