नव्या इलेक्ट्रिक अवतारात अम्बेसिडर कन्सेप्ट सादर


फोटो साभार मनोरमा
भारतात साठहून अधिक वर्षे ऑटो क्षेत्रात अधिराज्य गाजविणारी आणि भारतीय राजकारणी लोकांची खास ओळख बनलेली हिंदुस्थान मोटर्सची अम्बेसिडर पुन्हा एकदा ऑटो क्षेत्रावर जादू करण्यासाठी अवतरत असून यावेळी ती पेट्रोल, डिझेल नाही तर इलेक्ट्रीक अवतारात येणार आहे. ही कार अँबी कन्सेप्ट रुपात सादर केली गेली असून तिचा लुक रोल्स रॉयसला लाजवेल असा आहे.

अम्बेसिडर कारची क्रेझ ही गाडी बंद होऊन अनेक वर्षे लोटूनही कायम राहिलेली आहे. राजकारणी लोकांनी तिचा प्रामुख्याने सर्वाधिक वापर केला आणि त्यामुळे तिला आपोआप पॉवरफुल कारचे वलय प्राप्त झाले. भारतातील प्रसिद्ध कार कस्टमायझर दिलीप छाब्रिया यांची कंपनी डीसी डिझाईन ने या कारचे डिझाईन केले आहे. हे कन्सेप्ट पाहून कुणाच्या डोळ्यावर विश्वास बसणे कठीण आहे.

रोल्स रॉइसप्रमाणे ही लग्झरी कार पूर्वीपेक्षा आकाराने थोडी मोठी आहे. कार मध्ये वापरण्यात आलेले सर्व इलेक्ट्रिक पार्ट स्वित्झर्लंड मधून आयात केले गेले आहेत. कारचे इंटिरीअर अधिक चांगले करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. १९५६ ते १९५९ दरम्यान पहिली अम्बेसिडर इंग्लंड मध्ये तयार केली गेली होती आणि नंतर भारताची त्यावेळची प्रमुख ऑटो कंपनी हिंदुस्तान मोटर्सने भारतात ती पेश केली होती. या कारचे २०१४ पर्यंत उत्पादन सुरु होते आणि मग ते बंद केले गेले. २०१७ मध्ये हिंदुस्तान मोटर्सचे पीएसए ग्रुपने अधिग्रहण केले होते.

Leave a Comment