२० वर्षापूर्वी बंद झालेली करोना पुन्हा चर्चेत


फोटो साभार दिव्यभास्कर
जगभरात थैमान घातलेल्या करोना म्हणजे कोविड १९ विषाणू मुळे २० वर्षापूर्वीच बंद झालेली मात्र त्या काळात अतिशय लोकप्रियता मिळविलेली जपानी टोयोटा कंपनीची करोना कार पुन्हा एकदा या नामाच्या साधर्म्यामुळे चर्चेत आली आहे. आपल्या ४४ वर्षांच्या दीर्घ प्रवासात कारच्या या मॉडेलने तुफान लोकप्रियता मिळविली होती.

टोयोटाने त्यावेळी या कारमॉडेल ला करोना नाव दिले ते लॅटीन शब्द करोनावरून. या शब्दाचा अर्थ आहे क्राऊन किंवा मुकुट. १९५७ साली प्रथम ही कार लाँच करण्यात आली तेव्हा कंपनीचे क्राउन नावाचे एक मॉडेल होतेच. जपानी टोयोटाच्या सुरवातीच्या कार्स मध्ये करोनाचा समावेश होता आणि लोकप्रिय अँबेसीडर आणि प्रीमिअर पद्मिनी या गाड्यांशी तिचा लुक मिळताजुळता होता. १९६४ मध्ये या मॉडेलचे तिसरे जनरेशन आले आणि त्यात ३ दाराची व्हॅन आणि पाच दरवाजे असलेली स्टेशन वॅगनही होती.

३० वर्षात टोयोटाने करोनाच्या १० लाख कार्स विकल्या होत्या. त्यानिमित्ताने १९८७ मध्ये एक लिमिटेड एडीशन लाँच केली गेली होती आणि तिची केवळ ५०० युनिट तयार केली गेली होती. १९९८ मध्ये या मॉडेलचे शेवटचे जनरेशन आले आणि २००१ पर्यत फक्त जपानी बाजारात ते विकले जात होते. त्यावेळी मॉडेलच्या नावात प्रिमिओ जोडले गेले असले तर या मॉडेलने मिळविलेली अफाट लोकप्रियता लक्षात घेऊन करोना नाव कायम ठेवले गेले होते.

Leave a Comment