७७ वर्षात प्रथमच निवांतपणा भोगतोय हावडा ब्रीज


फोटो साभार हिंदुस्थान टाईम्स
जगभरातील देश आणि देशाचे नेते यांच्या डोक्यावर सध्या कोविड १९ मुळे काळजीचा प्रचंड भार आहे. कोलकाता येथील जगप्रसिध हावडा ब्रीज म्हणजे रविंद्र पूल मात्र या काळात ७७ वर्षात प्रथमच निवांतपणा भोगतो आहे. देशात लॉक डाऊन असल्याने रोज लाखो वाहने आणि लाखो पादचाऱ्यांचा भार अविरत सहन करणाऱ्या या पुलाला आता गर्दीपासून थोडी विश्रांती मिळते आहे.

या ब्रीजची देखभाल पोर्ट ट्रस्ट तर्फे केली जाते. या ट्रस्टचे अध्यक्ष विनीत कुमार म्हणाले, आज या पुलावर फक्त काही खासगी कार्स आणि आवश्यक सेवा वाहने यांचीच थोडी वर्दळ आहे. हुगली नदीवर बांधला गेलेला हा पूल जगातील सर्वाधिक वर्दळीच्या कँटीलिव्हर पुलापैकी एक आहे.७०५ मीटर लांबीच्या या पुलावरून रोज सरासरी ३ लाख वाहने आणि साडेचार लाख पादचारी जातात.

या पुलावरचा गर्दीचा ताण कमी व्हावा म्हणून १९९२ साली विद्यासागर सेतू बांधला गेला मात्र त्याचा फारसा फायदा झालेला नाही. या पुलाचे खास स्थान त्यावरची गर्दी कमी न होण्याचे कारण आहे. एका बाजूने हा पूल हावडा स्टेशनला जोडतो तर दुसऱ्या बाजूला बडा बाजारला जोडतो. पुलावरील वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन २००७ पासून मालवाहतूक गाड्या आणि ट्रकना बंदी केली गेली आहे. लॉक डाऊन संपताच हा पूल पूर्ण सॅनीटाईज केला जाणार आहे असेही विनीत कुमार यांनी सांगितले.

Leave a Comment