स्वस्त सिगरेटच्या नादात दुसऱ्या देशात पायी गेला व्यक्ती, अन् …

कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन आहे. अशा स्थिती घरातून बाहेर न पडण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र तरीही काहीजण विनाकारण बाहेर फिरताना आढळतात. लॉकडाऊनच्या काळात सिगरेट, दारूच्या व्यसनासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील कमी नाही. मात्र हे व्यसन अनेकदा जीवावर देखील बेतू शकते. सिगरेटच्या व्यसनामुळे अशाच एका व्यक्तीचा जीव गेला असता.

फ्रान्समधील एका व्यक्तीने चक्क स्वस्त सिगरेटच्या नादात फ्रान्सच्या पेरपिग्नॅन शहरातून डोंगर चढत स्पेनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला त्याने गाडीने जाण्याचा निर्णय घेतला मात्र त्याला चेकप्वाइंटवर अधिकाऱ्यांनी अडवले. त्यामुळे त्याने दुसऱ्या देशात जाण्यासाठी पर्वतांचा मार्ग निवडला.

स्पॅनिश सीमेजवळ राहणाऱ्या लोकांसाठी स्वस्त सिगरेट, दारू, फूड आणि इंधन घेण्यासाठी शेजारील देशात जाणे सर्वसाधारण गोष्ट आहे. मात्र सध्या बाहेरील लोकांसाठी अनेक सीमा बंद करण्यात आल्या आहेत.

या प्रवासात तो अचानक झऱ्यात पडला व हरवला. अशा स्थितीत त्याने मदतीसाठी माउंटेन रेस्क्यू सर्व्हिसकडे मागितली. अखेर हेलिकॉप्टरच्या मदतीने या व्यक्तीला वाचवण्यात आले. मात्र लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यामुळे व्यक्तीला 135 यूरो (11 हजार रुपये) दंड ठोठवण्यात आला.

Leave a Comment