न्याय देणारी गोलू देवता


फोटो सौजन्य अमर उजाला
मंदिरांचा देश असलेल्या भारतात नवसाला पावणारे देव शेकड्यांनी आहेत. पण न्याय मिळवून देणाऱ्या देवांची संख्या फारशी नाही. देवभूमी उत्तराखंड मधील गोलू देवता ही मात्र न्याय मिळवून देणारी देवता म्हणून केवळ देशातच नाही तर परदेशातही प्रसिध्द आहे. ज्यांना कुठेच न्याय मिळत नाही असे भाविक येथे त्यांचे मागणे असलेली चिट्ठी अडकवितात आणि त्यांना न्याय मिळाला की मंदिरात येऊन घंटा बांधतात.

उत्तराखंड राज्यात गोलू देवतांची अनेक मंदिरे आहेत पण त्यात सर्वात प्रसिद्ध आहे अल्मोडा जिल्ह्यातील चितई गोलू मंदिर. या परिसरात भाविकांची नेहमीच गर्दी असते. येथे टनावारी चिठ्या अडकविलेल्या दिसतात तसेच अक्षरशः मोजता येणार नाहीत इतक्या घंटासुद्धा बांधलेल्या दिसतात. अगदी टनी वजनाच्या घंटेपासून ते घरात वापरल्या जाणाऱ्या छोट्या घंटेपर्यंत विविध आकाराच्या घंटा मंदिरात चोहोबाजूला दिसतात. येथे सतत घंटानाद सुरूच असतो.


स्थानिक संस्कृतीत गोलू देवता लगोलग न्यायनिवडा करणारी देवता आहे. या देवाला अनेक नावे आहेत. गौर भैरव असेही एक नाव असून ही देवता शिवाचा अवतार मनाली जाते. काही तिला कृष्णाचा अवतार मानतात. काही लोक स्टँप पेपरवर सुद्धा त्यांना कशासाठी न्याय हवा ते लिहितात आणि तो कागद मंदिरात टांगून ठेवतात.

गोलू देवतेचे हे मंदिर विशाल असून मंदिरात पांढऱ्या घोड्यावर, डोक्यावर पांढरी पगडी बांधून बसलेल्या गोलूची मूर्ती आहे. तिच्या हातात धनुष्य आहे. असेही सांगतात हे मंदिर प्राचीन असून चंद वंशाच्या रजनी १२ व्या शतकात ते बांधले. मंदिर पहाडावर असून भोवती जंगलाने वेढलेले आहे.

Leave a Comment