सोशल मीडियावर अफवा; तुटले महालक्ष्मीचे मंगळसूत्र, 22 हजार महिला होणार विधवा


कोल्हापूर : एकीकडे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव राज्यासह देशभरात दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे विविध प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहे. त्यातच आता सोशल मीडियावर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई बद्दलची अशीच एक अफवा व्हायरल होत आहे.

या व्हायरल मेसेजमध्ये महालक्ष्मीच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटले असून त्या मंगळसूत्रातील 22 हजार मनी हरवले आहेत. त्यामुळे 22 हजार महिला विधवा होणार आहेत. पण त्यावर एक उपाय आहे. तो म्हणजे एक दोरा महिलांनी घेऊन तो पिवळा करून त्याच्यावर हळकुंड बांधून तो नवऱ्याकडून गळ्यात बांधवा, असा उपाय पुजाऱ्यांनी सांगितल्याचा उल्लेख करत सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राज्य प्रशासन कोरोना व्हायरस रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतानाच काही समाजकंटकांकडून अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहे. अंबाबाई मंदिरातील श्रीपूजकांनी याबाबत जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनेही अफवा असून यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

याबाबत माहिती देताना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले की, अंबाबाईबद्दलची ही अफवा शुक्रवारपासून सोशल मीडियात पसरवली जात आहे. कोल्हापूर व अन्य ठिकाणच्या भाविकांकडून याबाबत सातत्याने विचारणा होऊ लागली आहे. वस्तूस्थिती अशी की, अंबाबाईचे नित्य वापरातील सोन्याचे मंगळसूत्र व सौभाग्य अलंकार सुस्थितीत आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कोल्हापूरच्या मंदिरात कधीच गाऱ्हाणे घातले जात नाही. तरीही या संदेशात पुजाऱ्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. या संदेशामुळे आधीच कोरोनामुळे भयग्रस्त नागरिकांमध्ये आणखी भीती पसरली आहे.

दरम्यान, ज्या कुणी हा संदेश तयार करुन सोशल मीडियात व्हायरल केला आहे. त्यांनी समाजात हेतू पुरस्पर भीती पसरवली, श्रीपुजकांबद्दल गैरसमज पसरवणे, या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Comment