पेंटागॉनने दिली १ लाख बॉडी बॅग्जची ऑर्डर


जागतिक आरोग्य संघटनेने जगात एका आठवड्यात कोविड १९ च्या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा दुप्पट झाल्याचे जाहीर केले असून इटली, स्पेन, अमेरिकेला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. इटली, स्पेन मध्ये मृतांची संख्या १० हजारांच्या वर गेली असून अमेरिकेत हा आकडा ५ हजारावर गेला आहे. या स्थितीत अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटागॉनने १ लाख बॉडी बॅग्जची ऑर्डर दिली असल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिकेत कोविड १९ संसर्ग झाल्याची संख्या लाखात गेली असून या विषाणूशी सामना करण्याऱ्या टीमचे प्रमुख डॉ. फोसी यांनी अमेरिकेत कोविड १९ अडीच लाख लोकांचा जीव घेईल असा अंदाज वर्तविला आहे. अमेरिकेत या विषाणूचा सर्वाधिक उपद्रव न्युयॉर्क मध्ये असून तेथे अगोदरच ५० हजार बॉडी बॅग पुरविल्या गेल्याचे सांगितले जात आहे. न्युयॉर्क मध्ये २२२० जणांचा या विषाणूने बळी घेतला आहे आणि येथे ४७ हजार नागरिकांच्या चाचण्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

अमेरिकेच्या दहा राज्यात कोविड १९ चा फैलाव अधिक प्रमाणात आहे. त्यात न्यूयोर्क, न्यूजर्सी, कॅलिफोर्निया, मिशिगन, फ्लोरिडा, मॅसेच्युएट, इलिनॉय, लुईसियाना, पेनासिल्व्हिया व वॉशिंग्टनचा समावेश आहे. विशेष म्हणजे येथे अजूनही लॉक डाऊन केले गेलेले नाही.

Leave a Comment