मर्सिडीजसह या नेत्याला केले दफन


फोटो सौजन्य द सन
मृत्युपंथाला लागलेल्या माणसाची शेवटची इच्छा पूर्ण करण्याची प्रथा अनेक देशात आहे. यामुळे मृताच्या आत्म्याला शांती मिळते असा समज आहे. द. आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग मध्ये शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा एक अनोखा प्रकार नुकताच घडला. येथील राजकीय नेत्याला मृत्युनंतर त्याच्या इच्छेनुसार काफिन मध्ये नाही तर त्याच्या आवडत्या मर्सिडीज बेंझ गाडीत बसवून कारसह दफन केले गेले. विशेष म्हणजे मृतदेह स्टिअरिंग व्हील मागे होता आणि मृताचे हात स्टिअरिंग व्हीलवर ठेवले गेले होते.

युनायटेड डेमोक्रॅटिक मुव्हमेंटचे नेते शेकेडे पित्सो यांचा दिवसाचा बहुतेक वेळ त्यांच्या कार मधेच जात असे. आपला मृत्यू होईल तेव्हा कार सह आपले दफन केले जावे अशी त्यांची इच्छा होती ती परिवाराने पूर्ण केली. ही मर्सिडीज त्यांनी दोन वर्षापूर्वी खरेदी केली होती. त्यांना सहा मुले आहेत. मुलगी सेफोरा म्हणाली, माझे वडील व्यावसायिक होते आणि तेव्हा त्यांच्याकडे खूप मर्सिडीज कार्स होत्या. पण व्यवसायात नुकसान झाले तेव्हा त्यांना त्या विकाव्या लागल्या होत्या. दोन वर्षापूर्वी त्यांनी ही सेकंडहँड मर्सिडीज खरेदी केली होती. त्यांची शेवटची इच्छा आम्ही पूर्ण केली.

विशेष म्हणजे द. आफ्रिकेत सुद्धा करोना मुळे लॉकडाऊन आहे तरी तो मोडून शेकेडे यांच्या अंत्यसंस्काराला मोठी गर्दी उसळली होती. सर्वत्र हा चर्चेचा विषय झाला होता आणि सोशल मीडियावर त्याचे फोटो वेगाने व्हायरल झाले.

Leave a Comment