फॉर्म्युला वन इंजिनिअरनी बनविले खास ब्रिदिंग मशीन


फोटो सौजन्य पत्रिका
लग्झरी कार कंपनी मर्सिडीजच्या फॉर्म्युला वन इंजिनिअर्सनी लंडन युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने करोना रुग्णांसाठी खास ब्रिदिंग मशीन तयार केले असून यामुळे आयसीयु आणि व्हेंटिलेटरशिवाय या रुग्णांवर उपचार होऊ शकणार आहेत. जगात करोना विषाणूने थैमान घातले असून स्पेन इटली मध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. जगभरात सर्वत्र हॉस्पिटल्स मध्ये आयसीयु बेडस आणि व्हेंटिलेटर्सची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर हे नवे ब्रिदिंग मशीन अनेकांना जीवदान देऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हे नवे मशीन ऑक्सिजन मास्क आणि व्हेंटिलेटर या दोन्हीची गरज पूर्ण करणार आहे. हे मशीन बनविताना रिव्हर्स इंजिनिअरिंग प्रक्रीयेचा वापर केला गेला आहे. कंटिन्यूअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर (CPAP) असे नाव या मशीनला दिले गेले आहे. यामुळे मर्यादित वैद्यकीय सामग्री मध्येही गंभीर रुग्णांचा जीव वाचविणे शक्य होणार आहे. हे मशीन चार दिवसात तयार केले गेले आहे.

सध्या या मशीनच्या लंडन मधील हॉस्पिटल मध्ये क्लिनिकल चाचण्या घेण्यात येत आहेत. त्या यशस्वी ठरल्या तर दिवसाला १ हजार मशीन्स तयार केली जाणार आहेत. फुफ्फुसातील संक्रमणामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो आणि रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते त्यामुळे रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. नव्या मशीनचा वापर करताना रुग्णाला बेशुद्ध करण्याची आवश्यकता नाही असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment