त्रिपुरामध्ये बनतेय ५१ शक्तीपीठ प्रतिकृती मंदिर


फोटो सौजन्य ट्रीप अॅॅडव्हायझर
सध्या देशात चैत्री नवरात्र सुरु असून आज रामनवमी आहे. या काळात शक्तीची उपासना मोठ्या प्रमाणावर केली जाते. देशातील एकमेव म्हणता येईल असे एक मंदिर त्रिपुरा मध्ये तयार होत असून येथे ५१ शक्तीपीठाच्या प्रतिकृती स्थापन केल्या जाणार आहेत. १४ एकर जागेत हे भव्य मंदिर उभारले जाणार असून त्यासाठी ४४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

त्रिपुरा येथे त्रिपुरसुंदरी हे प्रसिद्ध शक्तीपीठ असून येथे देवी सतीचा डावा पाय पडला होता अशी मान्यता आहे. या मंदिरापासून जवळ फुलकुमारी गावात हे नवे मंदिर बांधले जाणार असून तसा प्रस्ताव पर्यटन विभागाने सरकारकडे सादर केला आहे. स्वदेश दर्शन योजनेखाली हा प्रकल्प तयार होत आहे.

देवी पुराणात १०८ शक्तीपीठाचा उल्लेख असला तरी जगात त्यातील ५१ शक्तीपीठे ग्रंथ मान्यताप्राप्त आहेत. त्यातील ३८ भारतात आहेत, नेपाळ मध्ये तीन, बांग्लादेशात ५, पाकिस्तानात दोन, श्रीलंका आणि तिबेट मध्ये प्रत्येकी एक शक्तीपीठ आहे. देशात बंगाल मध्ये सर्वाधिक ११ शक्तीपीठे आहेत. नवीन मंदिर उभारताना ५१ शक्तीपीठातील मूळ मुर्तीवर संशोधन करून त्यांच्या हुबेहुब प्रतिकृती तयार केल्या जाणार आहेत. त्रिपुरातील त्रिपुरसुंदरी शक्तीपीठ तंत्रपीठ म्हणून ओळखले जाते. हे मंदिर १५ व्या शतकातील असून राजा धन्यमाणिक याच्या काळात बांधले गेले आहे. येथे शिवाला त्रीपुरेश म्हटले जाते. मंदिरातील मूर्ती काळ्या ग्रॅनाईट मध्ये आहे.

नवीन मंदिर बांधले गेल्यावर राज्याचा पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल असा विश्वास पर्यटन विभागाने व्यक्त केला आहे.

Leave a Comment