अमेरिकेच्या अण्वस्त्रांचे रक्षण करताहेत डॉल्फिन आणि सी लायन


फोटो सौजन्य कॅच न्यूज
देशाच्या सीमा रक्षणासाठी अनेक प्रकारची हत्यारे बहुतेक सर्व देश तैनात करतात आणि या हत्यारांची सुरक्षा सैनिक करत असतात. देशातील अशी ठिकाणे गुप्त आणि संवेदनशील मानली जातात. जगात ज्या ज्या देशात अण्वस्त्रे आहेत तेथे सुरक्षेची जबाबदारी सैनिकच पार पडतात पण अमेरिकेत मात्र ही जबाबदारी डॉल्फिन आणि सी लायन पार पाडत आहेत.

अमेरिकेच्या सिअॅटल पासून २० मैलावर अमेरिकेचा नेव्ही बेस कॅम्प असून त्याला नेव्हल बेस किटसॅप म्हटले जाते. अमेरिकेच्या एकूण अण्वस्त्रांपैकी १/४ अण्वस्त्रे येथे आहेत. या अण्वस्त्रांमुळे एकाच वेळी जगातील अनेक देश नष्ट होऊ शकतात असे सांगितले जाते. या साठ्याची सुरक्षा विशेष प्रशिक्षण दिलेले डॉल्फिन आणि सी लायन करत असून त्यांची एक फौज त्यासाठी तयार केली गेली आहे. यात ८५ डॉल्फिन्स आणि ५० सी लायन्स आहेत.

कॅलिफोर्निया येथील प्रशिक्षण केंद्रात या प्राणी सैनिकांना प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यांच्या शरीराबाहेर एक बाईट प्लेट फिट केली गेली आहे. कुणी घुसखोर समुद्रातून आत घुसला, तर हे डॉल्फिन त्याच्या पायाला धडकतात आणि संबंधिताच्या पायाला ही प्लेट चिकटते. घुसखोराची माहिती जोपर्यंत हँडलर पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ही प्लेट घुसखोराच्या पायापासून वेगळी होत नाही. डॉल्फिन अतिशय हुशार असतात आणि समुद्रात खोल जाऊ शकतात. सी लायन यांची ऐकण्याची आणि पाहण्याची क्षमता फारच तेज असते. समुद्रात खोल जेथे गुडूप अंधार असतो तेथेही सी लायन पाहू शकतात त्यामुळे गस्तीच्या कामी ते खुपच उपयुक्त ठरतात असे म्हटले जाते.

Leave a Comment