टोक्यो ऑलिम्पिकचे नवे वेळापत्रक जाहीर


फोटो सौजन्य पत्रिका
जगभर करोना उद्रेकाची तीव्रता वाढत चालली असल्याचे परिणाम जपानमध्ये होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षाने पुढे ढकलण्यात झाला आहे. टोक्यो ऑलिम्पिक प्रमुख योशिवो मोरी यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन ऑलिम्पिक स्पर्धेच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार या स्पर्धा आता २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ रोजी होणार आहेत. पॅरालीम्पिक स्पर्धा २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२१ मध्ये होतील. पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे या स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट २०२० दरम्यान होणार होत्या.

इंटरनॅशनल ऑलिम्पिक समिती आणि जपान सरकारने या स्पर्धा पूर्वीच्या नियोजित वेळेतच होतील असे वारंवार जाहीर केले होते मात्र करोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन क्रीडा महासंघ आणि खेळाडूंनी या स्पर्धा पुढे ढकलल्या जाव्यात यासाठी दबाव आणल्याचे सांगितले जात आहे. परिणामी आयओसी आणि जपान सरकारला हा निर्णय घ्यावा लागला.

या स्पर्धेसाठी जपानने १२.६ अब्ज डॉलर्स खर्च केला होता आणि आता नव्या तारखांना या स्पर्धा घेण्यामुळे हा खर्च आणखी वाढणार आहे. हा भार पर्यायाने जपानी करदात्यांवर पडणार आहे. हॉटेल्स, तिकिटे, व्हेन्यू, परिवहन अश्या अनेक सेवांवर नुकसान सोसण्याची वेळ आली आहे. जपानने या ऑलिम्पिकला रिकव्हरी ऑलिम्पिक असे संबोधले होते. २०११ मधली त्सुनामी, भूकंप, फुकुशिमा किरणोत्सर्ग हे सारे त्रास झेलूनही देशाने ऑलिम्पिकचे आयोजन केले हे त्यांना दाखवून द्यायचे होते आणि जपान मध्ये आता कोणताही धोका नाही याची खात्री जगाला पटवायची होती.

Leave a Comment