जनतेला वाऱ्यावर सोडून थायलंड राजा जर्मनीत आयसोलेशन मध्ये


फोटो सौजन्य झी न्यूज
करोनाच्या जीवघेण्या संकटात देशातील जनतेला वाऱ्यावर सोडून थायलंडचे राजे वजीरालोंगकोन देश सोडून जर्मनीला गेले असून तेथे अलिशान हॉटेल मध्ये क्वारंटाईन झाले असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे राजाने त्याच्यासोबत २० महिला आणि काही नोकरवर्ग नेला असून या २० महिलांसह राजा या रिसोर्ट मध्ये मुक्काम करणार आहे. आंतरराष्ट्रीय मिडियानुसार राजाने जर्मनीतील अल्पाईन रिसोर्ट या अलिशान हॉटेल मध्ये आयसोलेशन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याच्या चार राण्या त्याच्यासोबत राहणार किंवा नाही हे समजू शकलेले नाही.

राजाने या निवासासाठी डीस्ट्रीक्ट कौन्सिलची विशेष परवानगी घेतली असल्याचे समजते. जर्मनीत या भागातील हॉटेल्स, गेस्ट हाउस करोना मुळे बंद केली गेली आहेत. मात्र गेस्ट सिंगल असून एकाच समूहात असल्याने त्याला परवानगी दिल्याचा खुलासा डीस्ट्रीक्ट कौन्सिल कडून केला गेला आहे. थाई जनता राजाच्या या वागण्याने संतप्त झाली असून राजावर टीकेची झोड उठविली गेली आहे. थायलंड मध्ये राजावर टीका केली तर १५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते मात्र जनता त्याची पर्वा न करता राजावर तोंडसुख घेऊ लागली आहे. थायलंड मध्ये करोना संसर्ग झालेल्यांची संख्या १२०० वर गेली आहे.

गेल्या वर्षी या राजाने राज्याभिषेक होण्यापूर्वी त्याच्या ताफ्यातील महिला सुरक्षा गार्ड बरोबर लग्न केले होते. त्यापूर्वी त्याची तीन लग्ने आणि तीन घटस्फोट झाले आहेत. त्याला सात मुले असून राजाचे वय ६६ वर्षे आहे.

Leave a Comment