बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटच्या टॉवेलला २५ लाखांची बोली


फोटो सौजन्य झी न्यूज
अमेरिकेचा दिग्गज बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट याच्या एका टॉवेलला व्हर्च्युअल लिलावात २५ लाखाची बोली मिळाली आहे. त्याने हा टॉवेल २०१६ मध्ये अंतिम सामन्यात निरोपाचे भाषण करताना गळ्यात घातला होता. कोबी आणि त्याची १३ वर्षीय मुलगी यांचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात २६ जानेवारी २०२० मध्ये निधन झाले होते. या हेलीकॉप्टर मधून प्रवास करत असलेले सर्व ९ प्रवासी या अपघातात ठार झाले होते.

कोबी २००८ आणि २०१२ मध्ये ऑलिम्पिक बास्केटबॉल सुवर्णपदक विजयी अमेरिकी संघाचा सदस्य होता. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन मध्ये लॉस एंजेलिस लेकर्स कडून तो सलग २० वर्षे खेळला होता. सीएनएनने दिलेल्या बातमीनुसार आयकॉनिक ऑक्शनचे अध्यक्ष जेफ वोल्फ यांनी कोबीने वापरलेला टॉवेल आणि या अंतिम सामन्याची दोन तिकिटे रविवारी व्हर्च्युअल लिलावात ३३,०७७.१६ डॉलर्सला ( २५.०२ लाख रुपये) विकली गेल्याच्या बातमीचे समर्थन केले आहे. डेव्हिड कोव्हर यांनी या साठी अंतिम बोली लावली. डेव्हिड कडे लेकर्सचे सर्वाधिक साहित्य असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment