मुंबईमधील वरळी कोळीवाडा परिसर संशयित रुग्ण आढळल्यामुळे सील


मुंबई – मुंबईतील वरळी कोळीवाडा परिसर कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण आढळल्याने मुंबई पोलिसांकडून सील करण्यात आला आहे. कोरोनाचे चार संशयित रुग्ण वरळीमधील कोळीवाड्यात आढळल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुबंई पोलिसांनी परिसर सील केला आहे. याठिकाणी पोलिसांकडून त्यासंबंधी उद्घोषणा केली जात असून कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले असल्याचे सांगण्यात येत आहे. या परिसराचे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून निर्जुंतुकीकरण सुरु आहे. पोलिसांनी परिसरात बॅरिकेट्स उभारले असून कोणालाही बाहेर येण्यास किंवा आतमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

वरळीमधील कोळीवाडा परिसरात कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. येथील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे यामधील एकानेही परदेशात प्रवास केलेला नाही किंवा कोरोनाची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेले नाहीत. लागण झालेले सर्वंजण ५० हून जास्त वयाचे आहेत.

यामधील एकजण ट्रॉम्बे येथे कूक म्हणून काम करत होता. त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. तर इतर तिघे जण स्थानिक ठिकाणी काम करत असून जास्त प्रवास करत नाहीत. त्यामुळे यांना लागण नेमकी झाली कशी याची माहिती घेतली जात असल्याची माहिती जी दक्षिण वॉर्डचे महापालिक सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली आहे.

लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंग गांभीर्याने घेत नसणाऱ्यांबद्दल महापालिका चिंताग्रस्त असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आम्ही लॉकडाउन अजून कठोर करणार आहेत. अनेकदा सांगूनही, आवाहन करुनही लोक ऐकण्यास तयार नाहीत. अजूनही लोक आपल्या घराबाहेर पडत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळत नाही आहेत. आम्ही कोळीवाड्यात निर्जुंतुकीकरण करत असून लोकांनी लॉकडाउनच्या नियमांचे पालन केले पाहिजे. अन्यथा हा व्हायरस अजून पसरत जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment