तरंगत्या दगडात बांधले गेलेय हे ८०० वर्षे जुने मंदिर


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
भारताची ओळख मंदिराचा देश अशीही आहे. देशात अशीही अनेक मंदिरे आहेत जी रहस्यमयी म्हणून ओळखली जातात. ही यादीही भली मोठी आहे. त्यातील एक प्रसिद्ध मंदिर तेलंगणाच्या वारंगळ येथे असून हे मंदिर शिवाला समर्पित आहे. हे मंदिर तरंगणाऱ्या दगडातून बनविले गेले आहे. हे शिवमंदिर रामाप्पा मंदिर नावाने प्रसिद्ध असून मंदिराला हे नाव मंदिर बांधणारे शिल्पकार रामाप्पा याच्यावरून दिले गेले आहे.


१२ व्या शतकात काकतीय वंशाचा राजा गणपती देवा याने १२१३ मध्ये या मंदिराचे बांधकाम सुरु केले आणि ते पूर्ण होण्यास ४० वर्षे लागली. या काळातील अनेक मंदिरे आज भग्नावस्थेत आहेत मात्र रामाप्पा मंदिर अनेक नैसर्गिक आघात सोसूनसुद्धा आजही चांगल्या स्थितीत आहे. हे मंदिर अजूनही चांगल्या स्थितीत कसे याचे संशोधन वैज्ञानिकांनी केले पण काही उलगडा झाला नाही तेव्हा त्यांनी मंदिरात वापरल्या गेलेल्या दगडाचे परीक्षण केले. हे दगड अतिशय हलके आहेत आणि त्यांचे तुकडे पाण्यात तरंगतात असे यातून दिसून आले.

हे मंदिर सहा फुट उंचीच्या जोत्यावर बांधले गेले असून मंदिराच्या भिंतीवर रामायण महाभारतातील प्रसंग कोरले गेले आहेत. हे सर्व काम अतिशय सुबक आणि सुंदर आहे. मंदिरात ९ फुट उंचीचा नंदी आहे. राजा गणपती देवा शिल्पकार रामाप्पा याच्या कामावर इतका खुश झाला होता की त्यानेच या मंदिराचे नाव रामाप्पा मंदिर असे ठेवल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment