स्लोवाकिया राष्ट्रपतींचा मास्क बनला फॅशन आयकॉन


फोटो सौजन्य रेडीफ
करोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकांना मास्क वापरावे लागत आहेत हे खरे असले तरी काही व्यक्ती त्यातही त्यांचा ड्रेसिंग सेन्स सांभाळत असल्याचे दिसून येत आहे. याचे सर्वोत्तम उदाहरण आहे स्लोवाकियाच्या राष्ट्रपती जुजाना कॅपूतोवा. त्यांनी त्यांच्या फॅशन सेन्सचे दर्शन त्यातून घडविले आहेच पण मास्क लावलेल्या सर्व लोकांमध्ये ठळकपणे उठून कसे दिसता येते हेही दाखवून दिले आहे.

सर्वसामान्य आणि काही सेलेब्रिटीसुद्धा बाजारात मिळतील ते आणि मिळतील त्या रंगाचे मास्क वापरताना दिसत असताना जुजाना यांनी घरी शिवलेले आणि ड्रेसला मॅचिंग होतील असे मास्क वापरण्याचा सपाटा लावला आहे. स्लोवाकिया मध्ये नुकतेच संयुक्त सरकार स्थापन झाले असून त्याच्या शपथविधी कार्यक्रमाला राष्ट्रपती जुजाना लाल रंगाचा ड्रेस आणि त्याला मॅचिंग रंगाचा मास्क या वेशात उपस्थित होत्या. त्यामुळे त्या मास्क लावलेल्या सर्व गर्दीत वेगळ्या उठून दिसल्या हे खरे. वेळोवेळी ड्रेसच्या रंगाचे मॅचिंग मास्क घातलेले त्यांचे फोटो ट्विटरवर व्हायरल झाले आहेत.

Leave a Comment