कुत्र्याने भागविली मालकाची चिप्स खाण्याची इच्छा


करोना मुळे घराघरातून लोक बंदी बनले आहेत. ही परिस्थिती किती दिवस राहणार याची खात्री नाही. मात्र घरबसल्या सतत काही ना काही तोंडात टाकण्याची सवय वाढीस लागली असून बाहेरचे पदार्थ घरी कसे मागवायचे याचे एक मस्त उदाहरण समोर आले आहे. मेक्सिकोतील सेल्फ आयसोलेशन मध्ये असलेल्या इंतोल्नियो मुनो याला असेच चिप्स खाण्याची इच्छा झाली. दुकान घरासमोर होते पण घराबाहेर पडणे शक्य नव्हते.

इंतोल्नियोने एक युक्ती केली. त्याच्याकडे ओजो नावाचा एक पाळीव कुत्रा आहे. त्याने ओजोच्या गळ्यात दुकानदरासाठी निरोप लिहिलेली एक चिठ्ठी अडकविली आणि ओजोच्या गळ्यातील पट्ट्यात २० डॉलर्सची एक नोटही. ओजोला त्याने घरासमोरच्या दुकानात पाठविले. ओजो गेला आणि तेथे जाऊन भुंकू लागला तेव्हा दुकानदाराला त्याच्या गळ्यातील चिट्ठी दिसली. त्यावर मजकूर होता, ‘ प्रिय दुकानदार, मला काही चिप्स हवे आहेत. ओजोच्या जवळ २० डॉलर्स दिले आहेत. नारिंगी रंगाचे चिप्स पाठवा, लाल रंगाचे नकोत, ते तिखट असतात. ओजोशी चांगले वागा नाहीतर तो चावेल. मी समोरच राहतो.’

दुकानदाराने त्याप्रमाणे ओजोकडे चिप्स दिले आणि ते घेऊन ओजो घरी पोहोचला तेव्हा मालकाला इतका आनंद झाला की त्याने ओजोचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. बघताबघता हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.

Leave a Comment