गेली १०० वर्षे विराण आहे फ्रांसचा हा भाग


कोविड १९ ला जागतिक आरोग्य संघटनेने महामारी जाहीर केल्यानंतर जगभरातील अनेक देशात लोक घरात अडकून पडले आहेत आणि रस्ते ओस पडले असल्याचे दृश्य पाहायला मिळते आहे. मात्र करोना ही काही पहिलीच अशी भयानक रोगाची साथ नाही. यापूर्वीही अनेक भयंकर साथी येऊन गेल्या आहेत आणि त्यात लाखो लोकांचे जीव गेले आहेत. फ्रांस मध्ये गेली १०० वर्षे एके काळी नऊ गावे ज्या भागात सुखाने नांदत होती असा एक भाग आता विराण पडला आहे. येथे जाण्याची माणसानाच नाही तर प्राण्यानांही बंदी आहे. अर्थात त्यामागचे कारण साथीचा रोग नसून पहिले महायुद्ध आहे.

या भागाला झोन रॉंज किंवा रेड झोन असेच म्हणतात. फ्रांसच्या उत्तर पूर्व भागात हा झोन असून अन्य भागापासून त्याला वेगळे केले गेले आहे. या ठिकाणी जागोजागी डेंजर झोनच्या पाट्या लावल्या गेल्या आहेत. म्हणजे तुम्ही आत गेलात तर जीवाला धोका आहे असा इशारा त्यातून दिला गेला आहे.

पहिल्या महायुद्धाच्या काळात येथे ९ गावे होती आणि लोक शेती करून उपजीविका करत होते. मात्र या भागात इतक्या प्रचंड प्रमाणावर बॉम्ब पडले की हा संपूर्ण भाग बरबाद होऊन गेला. प्रेतांचे ढीग लागले. घातक रसायने असलेली सामग्री जागोजागी पडली यामुळे येथील केवळ जमीनच नाही तर पाणीही विषारी बनले. हा भाग स्वच्छ करणे अशक्य बनले आहे त्यामुळे तो धोकादायक बनला आहे.

या भागातील माती आणि पाण्याचे परीक्षण केले गेले तेव्हा त्यात अर्सेनिक या जहाल विषाचा अंश मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून आले. अर्सेनिक या विषाचा एक कण चुकून जरी माणसाच्या शरीरात गेला तरी त्याचा मृत्यू होतो इतके हे विष जहाल आहे. काही लोक या भागात महायुद्धात ठार झालेल्या लोकांचे आत्मे भटकतात असेही सांगतात.

Leave a Comment