नासाकडेही नाही या देवी मंदीराच्या रहस्याचे उत्तर


फोटो सौजन्य उत्तराखंड
गुढीपाडव्यापासून चैत्री नवरात्राची सुरवात झाली असून या नऊ दिवसात नवदुर्गांची पूजा, उपासना आराधना भाविक करतील. दुर्गेच्या या नवरूपातील सहावे रूप आहे कात्यायनी माता. ही देवी जेथे प्रकट झाली ते स्थान म्हणजे उत्तराखंड मधील अल्मोडा पासून जवळ असलेला कसार पहाड. येथे शुंभ आणि निशुंभ या दोन राक्षसांचा वध करण्यासाठी कसारदेवी म्हणजे कात्यायनी तिचे वाहन सिंह याच्यासह प्रकट झाली आणि या दोन राक्षसांचा तिने वध केला असे स्कंद पुराणात म्हटले गेले आहे.

या मंदिराची प्रसिद्धी देशविदेशात पसरलेली आहे ती एका रहस्यामुळे. या मंदिरात अगम्य चुंबकीय शक्ती आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या संशोधकांनी त्यामागचे गुढ उकलण्यासाठी खूप संशोधन केले पण त्यांना ते उलगडता आले नाही. या वैज्ञानिकांनी या भागात तीव्र स्वरुपाच्या चुंबकीय लहरी आहेत हे मान्य केले पण या लहरी कश्यामुळे उत्पन्न होतात याचे स्पष्टीकरण त्यांना देता आले नाही. या संपूर्ण पहाडावर अश्या लहरी आहेत पण सर्वाधिक पॉवरफुल लहरी मंदिरातून येतात असे दिसून आले आहे.


पर्यावरण तज्ञ आणि संशोधक डॉ. अजय रावत यांनीही येथे संशोधन केले आहे. त्यांच्या मते मंदिराच्या जवळ विशाल चुंबकीय पिंड असावेत. जगात अश्या प्रकारची तीन ठिकाणे आहेत. एका कसार देवी, दुसरे द. अमेरिकेच्या पेरू येथील माचूपिचू आणि तिसरे इंग्लंड मधील स्टोन हेंग. या तिन्ही स्थळात अद्भूत साम्य आहे कारण ही तिन्ही स्थळे चुंबकीय शक्तीचे केंद्रे आहेत.

रावत यांच्या मते कसारदेवी मंदिरात निसर्गसौंदर्य, मानसिक शांती आणि चुंबकीय शक्ती असा तिन्हीचा संयोग असून ही शक्ती पोझिटिव्ह एनर्जी देणारी आहे. त्यामुळे येथे अनेक भाविक ध्यानधारणा, तपस्या करतात. स्वामी विवेकानंद यांनीही येथे तपस्या केली होती. हे मंदिर अतिप्राचीन असल्याचे उल्लेख शिलालेखात आहेत. या मंदिर परिसरात मोबाईल वा अन्य डिव्हायसेस निष्प्रभ ठरतात तसेच बाहेरचे आवाजही आत ऐकू येत नाहीत.

Leave a Comment