आता कोरोनानंतर चीनमध्ये हंता व्हायरसमुळे व्यक्तीचा मृत्यू

कोरोना व्हायरसचा सामना करत असलेल्या चीनच्या यूनान प्रांतात एका व्यक्तीचा हंता व्हायरसने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही व्यक्ती कामासाठी बसमधून शाडोंग येथे येत होती. त्या व्यक्तीसह बसमध्ये असलेल्या अन्य 32 जणांची तपासणी करण्यात आली.

आधीच नागरिकांमध्ये कोरोना व्हायरसमुळे भिती असताना हंता व्हायरसमुळे नागरिक अधिक घाबरले आहेत व सोशल मीडियावर आपली भिती दर्शवत आहेत.

काय आहे हंता व्हायरस ?

तज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरसप्रमाणे हंता व्हायरस घातक नाही. कोरोनाप्रमाणे हा व्हायरस हवेद्वारे पसरत नाही. हा व्हायरस उंदीर अथवा खारीच्या संपर्कात आल्याने पसरतो. सेंट्रल फॉर डिजिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, उंदीर घराच्या आत-बाहेर करतात त्यामुळे हा व्हायरस पसरतो. निरोगी व्यक्तीला देखील या व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो.

कोरोनाप्रमाणे हंता व्हायरसचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. मात्र जर उंदराची विष्ठा, मुत्र इत्यादी गोष्टींना स्पर्श केल्यानंतर डोळे, नाक आणि चेहऱ्याला स्पर्श केल्यास या व्हायरसच्या संक्रमणाचा धोका वाढतो. या व्हायरसचा संसर्ग झाल्यास व्यक्तीला ताप, डोके दुखी, पोटात दुखणे, उल्टी, जुलाब इत्यादी होऊ शकते. उपचारास उशीर झाल्यास, श्वसनासंबंधी समस्या निर्माण होऊ शकते.

सीडीसीनुसार हा व्हायरस देखील जीवघेणा आहे. याचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या मृत्यूचा आकडा सरासरी 38 टक्के आहे.

Leave a Comment