इंडिअन ऑइल बनली देशातील स्वच्छ इंधन पुरविणारी पहिली कंपनी


फोटो सौजन्य ब्लुमबर्ग
भारताची सर्वात बडी तेल कंपनी इंडिअन ऑइल कार्पोरेशन बीएस ६ उत्सर्जन मानकचे इंधन पुरवठा करणारी देशातील पहिली कंपनी ठरली आहे. जगातील हे पहिले स्वच्छ इंधन आहे. या इंधनाचा वापर संपूर्ण भारतात १ एप्रिल पासून केला जाणार आहे. आयओसीने दोन आठवड्यापूर्वीच २८ हजार पेट्रोल पंपाना या इंधनाचा पुरवठा सुरु केला आहे.

या इंधनात मानवी आयुष्य आणि पर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या सल्फरचे प्रमाण अतिशय कमी असते. आयओसीचे अध्यक्ष संजीव सिंह या संदर्भात बोलताना म्हणाले, आम्ही या इंधनाचा पुरवठा देशभर सुरु केला आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमनेही याच इंधनाचा पुरवठा सुरु केला असून संपूर्ण देशात एक आठवड्यात या स्वच्छ इंधनाचा पुरवठा सुरु केला जात आहे.

उत्सर्जन मानकात पेट्रोल, डिझेल मधून निघणारा धूर आणि त्यात सल्फरचे प्रमाण किती हे तपासले जाते. भारताने बीएस ४ वरून बीएस ६ वर जाण्यासाठी अवघी ३ वर्षे घेतली आहेत. विशेष म्हणजे २००० सालानंतर प्रथमच एकाच वेळी देशभर ही मानके लागू केली गेली आहेत. यापूर्वी ही मानके प्रथम मेट्रो शहरात आणि नंतर टायर २ व टायर ३ शहरात लागू केली जात होती. बीएस ४ मध्ये पेट्रोल आणि डिझेल मध्ये प्रत्येक किलोग्राम मागे ५० मिलीग्राम सल्फर उत्सर्जन होत असे. बीएस ६ मुळे हेच प्रमाण प्रत्येक किलोग्राम मागे १० मिलीग्रामवर येणार आहे.

Leave a Comment