कोरोना व्हायरसः कनिका कपूर विरुद्ध लखनौमध्ये गुन्हा दाखल


लखनौ – हलगर्जीपणा केल्याप्रकरणी लखनौमध्ये प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झालेल्या कनिकामुळे उत्तरप्रदेशात आणखी तीन जण पॉझिटिव्ह आढळल्याचे ट्विट एका वृत्तसंस्थेने केले आहे. आपल्याला गेले चार दिवस ताप होता, पण त्यानंतर केलेल्या तपासणीत आपल्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याचे कनिकानेच एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले.

आता तिला आणि तिच्या कुटुंबाला क्वारंटाईन करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आपण इतरांप्रमाणे विमानतळावर तपासणीही केली होती, असे तिने सांगितले. पण ही तपासणी तिने चुकवल्याचा आरोप तिच्यावर होतो आहे. कनिका राहात असलेल्या सोसायटीला सील करण्यात आले आहे. तसेच लखनौ शहरातील सर्व दुकाने, खासगी आस्थापनांना 23 मार्चपर्यंत कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कनिका कपूरच्या सोसायटीमध्ये 700 फ्लॅट्स आहेत. लखनौमधले अनेक प्रतिष्ठित लोक या ठिकाणी राहतात. आता येथे राहणाऱ्या लोकांची तपासणी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. यातील अनेक लोक कनिकाने दिलेल्या पार्टीत सहभागी झाले होते. ही पार्टी माजी खासदार अकबर अहमद डंपी यांच्या घरी झाली होती.

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचे पुत्र खासदार दुष्यंत सिंह या पार्टीत सहभागी झाले होते. त्यामुळे कनिका कपूरला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे तिने जाहीर केल्यानंतर वसुंधराराजे यांनी आपणही काही काळासाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये जात असल्याचे ट्विट केले. या पार्टीमध्ये काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद आणि उत्त प्रदेशचे आरोग्यमंत्री जयप्रताप सिंह हे सुद्धा सहभागी झाले होते, असे सांगण्यात येते.

पण संसेदत दुष्यंत सिंह यांची भेट घेतल्यानंतर अनेक खासदारांनी स्वतः विलगीकरणाचा निर्णय घेतला आहे. यात उत्तर प्रदेशच्या अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल तसेच तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ’ब्रायन हेसुद्धा आहेत. तसेच, खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या या खासदारांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली होती. तेथेही दुष्यंत सिंह हजर असल्यामुळे आता आणखी भीती व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment