कोरोना; रेल्वेतील चहा, नाश्ता, जेवण बंद


नवी दिल्ली – कोरोना व्हायरसने भारतातही धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. प्रशासनाकडून कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे योग्य ते निर्णय घेण्यात आले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच येत्या रविवारी संपूर्ण देशात जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. इंडियन रेल्वे केटरिंग ऍन्ड कॉर्पोरेशनने (IRCTC) याच पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रेल्वेस्थानकावरील प्रवाशांना येत्या उद्यापासून चहा, नाश्ता आणि भोजनही मिळणार नाही. तसेच रेल्वेस्थानकावरील फूड फ्लाझा, रिफ्रेशमेंट, सेल किचन आणि जन आहारदेखील बंद करण्यात येणार आहे. आयआरसीटीसीकडून येत्या 22 मार्चपासून सुचनांचे कठोरपणे पालन केले जाईल. याशिवाय, यासंदर्भात सर्व रेल्वेस्थानकांना आदेश देण्यात आलेले आहेत, असे मुख्य क्षेत्रीय महाव्यवस्थापक अश्विनी श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.

देशात सध्या कोरोना व्हायरसचे 271 रुग्ण असून यांची संख्या अजून वाढू नये, म्हणून सरकारकडून खबरदारीची पाऊल उचलली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच पार्श्वभूमीवर 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. जनता कर्फ्यू दरम्यान सकाळी 7 ते रात्री 9 या दरम्यान नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे सांगण्यात आले आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने देखील अनेक एक्सप्रेस रेल्वे रद्द केल्या आहेत. तसेच मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल रेल्वेही रद्द करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आयआरसीटीसीचे ग्रुप महाव्यवस्थापक आशीष भाटिया यांनी यांसंदर्भात 20 मार्चला सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून सूचना केली आहे. यानुसार जोवर पुढील आदेश येत नाही, तोपर्यंत मेल आणि एक्सप्रेस रेल्वेमधील पेन्ट्रीकार आणि साईड वेडिंग व्यवस्था बंद राहतील.

Leave a Comment