‘जनता कर्फ्यू’च्या पार्श्वभूमीवर लांब पल्ल्याच्या ४000 गाड्या रद्द


मुंबई : उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘जनता कर्फ्यू’च्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवारी मुंबईत मोजक्याच लोकल चालविण्याचा निर्णय घेतला असून शनिवारी त्याचा तपशील जाहीर केला जाईल.

त्याचवेळी देशभरातील रेल्वेच्या ४००० गाड्या बंद राहणार आहेत. २४०० पॅसेंजर तर, १३०० लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा यात समावेश आहे. या रेल्वे रविवारी पहाटे ४ ते रात्री १० या काळात बंद राहणार आहेत. याबाबतच्या सूचना रेल्वेच्या सर्व विभागांना करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईत रविवारी लोकलचे वेगळे वेळापत्रक असते. तसेच काही सेवा मेगाब्लॉकच्या काळात रद्द केल्या जातात. त्यानंतरही अनेक लोकल रद्द करण्याची तयारी रेल्वेने केली आहे. मध्य रेल्वेकडून मुख्य, हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गावरील आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या किती फेऱ्या रद्द होतील, याची माहिती शनिवारी जाहीर केली जाईल. फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम, जनआहार, सेल किचन या सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा आयआरसीटीसीनेही निर्णय घेतला आहे.

Leave a Comment