ही आहेत जगातील काही झपाटलेली कारागृहे


फोटो सौजन्य बीबीसी
दिल्लीच्या तिहार जेल मध्ये निर्भया केस मधील चार आरोपींना फाशी दिल्यानंतर पुन्हा एकदा तिहार मध्ये भुते असल्याच्या अफवांना उत आला आहे. संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरु याला तिहार मध्ये फाशी दिल्यावर त्याचे भूत तिहार मध्ये फिरते अशी अफवा अनेक दिवस आहे. पण केवळ भारताच्या तुरुंगाबाबत अश्या अफवा नाहीत तर जगात अनेक ठिकाणी अशी झपाटलेली कारागृहे आहेत.

अमरिकेतील फिलाडेल्फिया येथील इस्टर्न स्टेट पेनिटेनशियरी जेलला भूताची इमारत असेच म्हटले जाते. १८२९ मध्ये बांधलेल्या या तुरुंगात जे कैदी सिंगल सेल मध्ये असतात त्यांना अनेकदा वाईट शक्तीचा अनुभव येतो असे सांगितले जाते. अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया मधील याच नावाचा तुरुंग जगातील सर्वात खतरनाक तुरुंगापैकी एक मानला जातो. १८६६ मध्ये हा तुरुंग बांधला गेला असून येथे इलेक्ट्रिक खुर्चीवर बसवून मृत्युदंडाची शिक्षा देण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथेही भुते आहेत असा समज आहे. या तुरुंगात अतिधोकादायक गुन्हेगारांना ठेवले जाते.


अमेरिकेच्याच कॅलिफोर्निया राज्यातील सॅनफ्रान्सिस्को मधील अल कार्टज मधेही खतरनाक गुन्हेगार ठेवले जातात. त्यातील काहींनी आत्महत्या केल्यावर येथेही भूतांचा संचार आहे अशी अफवा आहे. ब्रिटनच्या बोडमीन जेल मध्ये काही अमानवी घटना घडतात. येथेही काही गुन्हेगारांना फाशी दिले गेले आहे. तेथेही भुते भटकतात, अचानक दबके आवाज येतात आणि गुढ विचित्र प्रकाश दिसतो असे म्हटले जाते. ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात भयानक तुरुंग म्हणजे ९०० वर्षापूर्वी बांधलेला टॉवर ऑफ लंडनमधील तुरुंग. ब्रिटीश राजघराण्यातील काही व्यक्तींना दोषी ठरवून या तुरुंगात डांबले गेले होते. हा तुरुंग फारच भयानक असल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment