हिंदुस्तान लिव्हर, गोदरेज आणि पतंजली या प्रमुख कंपन्यांनी साबण, सॅनिटायझर आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांचे दर कमी केल्याची घोषणा केली असून या उत्पादनांचे उत्पादन वाढविले जात असल्याचे सांगितले आहे. देशात करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सरकार जी पावले उचलत आहे त्याला पाठींबा दर्शविताना या कंपन्या देशवासियांच्या मदतीसाठी वरील वस्तूंचे उत्पादन वाढवीत आहेत असे सांगितले जात आहे.
या कंपन्यांनी करोना प्रतिबंधासाठी घटविले साबणाचे दर
हिंदुस्तान लिव्हरने करोना विरुध्द लढाईसाठी १०० कोटी खर्चाची योजना आखली असून लाईफबॉय साबण, सॅनिटायझर, लिक्विड हँडवॉश, डोमेक्स फ्लोर क्लीनरच्या किमती १५ टक्के कमी केल्या आहेत आणि ही नव्या दराची उत्पादने पुढील आठवड्यात बाजारात येत आहेत असे जाहीर केले आहे. समाजातील गरजू लोकांसाठी काही महिन्यात २ कोटी लाईफबॉय साबण वाटले जाणार आहेत.
हिंदुस्थान लिव्हरचे व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता यांनी देशावरील संकट काळात कंपन्यांनीही त्यांची जबाबदारी ओळखून मदतीचा हात पुढे केला पाहिजे असे म्हटले आहे. रामदेवबाबांच्या पतंजलीने अॅलोवेरा, चंदन हळद उत्पादनांचे दर साडेबारा टक्के कमी केले आहेत तर गोदरेजने कच्च्या मालाचे दर वाढले असले तरी त्याचा बोजा ग्राहकांवर न टाकता पूर्वीच्याच दरात ही उत्पादने विकली जाणार असल्याचे जाहीर केले आहे.