किंग ऑफ कोकेन पाब्लो एस्कोबारची चित्तरकथा


फोटो सौजन्य पत्रिका
अमेरिकेतील कोलंबिया सरकारचा शत्रू पण दिनजनांचा रॉबीनहूड किंवा देवदूत पाब्लो एस्कोबार याची चित्तरकथा अनेकांना ऐकून माहिती असेल. किंग ऑफ कोकेन या नावाने प्रसिद्ध असलेल्या पाब्लोच्या असंख्य हकिकती आजही मोठ्या आवडीने चर्चिल्या जातात. गरीब शेतकरी आणि शिक्षिका आईच्या पोटी जन्मलेल्या या मुलाने स्वतःचे साम्राज्य उभे केले होते आणि खोऱ्याने पैसा मिळवून तसाच तो उधळला होता. हा सारा पैसा त्याने गुन्हेगारीतून मिळविला होता.

मेंदेलीन शहराचा हा रहिवासी. त्याने त्याच्या गुन्ह्यांची सुरवात केली ती सिगरेट विक्री आणि अपहरणे करून. काही वर्षात तो यात इतका प्रवीण झाला की त्याला माफियांचा बाप अशी ओळख मिळाली. मात्र त्याचे नशीब खरे पालटले ते त्याने कोकेनच्या व्यवसायात पाउल टाकले तेव्हा. तो याही व्यवसायात इतका निपुण झाला की त्याला किंग ऑफ कोकेन अशी ओळख मिळाली होती. या व्यवसायात त्याने इतका पैसा मिळविला की फोर्ब्सने १९८९ च्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्याला सात नंबरचे स्थान दिले होते. त्यावेळी त्याची संपत्ती २५ अब्ज अमेरिकन डॉलर्स होती. अलिशान घरे, गाड्या, खासगी विमाने त्याच्या मालकीची होती.

असेही सांगतात की प्रवासात असताना त्याच्या मुलीला थंडी वाजत होती म्हणून त्याने २० लाख डॉलर्सच्या नोटा जाळून ऊब निर्माण केली होती. त्याच्या नोटांच्या गड्ड्या बांधण्यासाठी दर आठवड्याला १ हजार डॉलर्सची रबरबँड लागत असेही सांगतात. त्याचा पैसा ठेवण्यासाठी वेअरहाउस होती आणि तेथे वर्षाला १ अब्ज डॉलर्सच्या नोटा उंदीर कुरतडून टाकत असत.

सरकारी कर्मचाऱ्यांना तो सरळ दम देत असे, लाच घ्या नाहीतर बंदुकीची गोळी खा. त्याच्या वागण्याने त्याला अनेक शत्रू निर्माण झाले होते पण त्याने सर्वसामान्य जनतेसाठी हॉस्पिटल, स्टेडियम, घरे बांधली होती त्यामुळे त्यांच्यासाठी तो देवदूत होता. त्याचा एक महाल ७ हजार एकर परिसरात होता. तेथे त्याचे खासगी प्राणी संग्रहालय होते आणि त्यात जगातून स्मगल करून आणलेले हत्ती, जिराफ, शहामृग, झेब्रा, उंट असे २०० प्राणी होते.

पाब्लोने निवडणूक जिंकली होती मात्र दोन वर्षात त्याला राजीनामा द्यावा लागला होता. सरकारचे कर्ज फेडण्याची तयारी त्याने दाखविली होती आणि त्याबदली त्याच्यावरचे अपहरण, खंडणीचे गुन्हे मागे घ्यावेत अशी त्याची मागणी होती. हा पाब्लो १९९३ मध्ये पोलिसांच्या धाडीत पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना मारला गेला. त्याने त्याच्या गुन्हेगारी आयुष्यात ४ हजार लोकांना ठार केले होते त्यात पोलीस आणि सरकारी अधिकारीही होते.

Leave a Comment