कनिका कपुरसोबत पार्टीत सामील झालेल्या भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचे क्वारंटाईन


जयपूर : बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच कनिका ही लंडनहून परतली होती. त्यानंतर लखनऊमध्ये झालेल्या एका मेजवानीत ती उपस्थित होती. राजकारण आणि इतर क्षेत्रातील 300 दिग्गज त्या मेजवानीला उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. त्यात भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे या देखील उपस्थित होत्या. कनिका ही पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मुलगा दुष्यंत यांच्यासह आपण क्वारंटाइन झाल्याचे वसुंधराराजे यांनी जाहीर केले आहे.

आपण लखनऊला मुलगा दुष्यंत यांच्या सासुरवाडीच्या लोकांसोबत एका भोजन समारंभात उपस्थित होतो. कनिका त्या कार्यक्रमाला होती. ती पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर मी आणि दुष्यंत सेल्फ आयसोलेशनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी हा निर्णय खबरदारीचा उपाय म्हणून घेतला असून डॉक्टर जे सांगत आहेत त्या सगळ्यांचे पालन करत असल्याचेही त्यांनी ट्विटरवर जाहीर केले आहे.

काही दिवसांपूर्वीच लंडनवरून कनिका कपूर भारतात परतली होती आणि सूत्रांच्या माहितीनुसार तिला कोरोना झाल्याची माहिती काही दिवस तिने सर्वांपासून लपवून ठेवली होती. काही दिवसांपूर्वी लंडनवरुन भारतात परतल्यावर कनिकाने एक हायप्रोफाइल पार्टी सुद्धा अटेंड केली होती. ज्यात राजकीय वर्तुळातील अनेक नेते आणि जज यांच्यासह जवळपास 300 लोक सामील झाले होते.

Leave a Comment