मुंबईसह महत्वाची शहरे ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी राज्यातील जनतेला संबोधित करताना कोरोनाचा फैलाव झालेल्या मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर शहरांत जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने आणि ऑफिसेस बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर ही शहरे बंद राहणार आहेत. तर शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर शहर बंद ठेवण्याची अंमलबजावणी होणार आहे. जगण्यासाठी आपल्याला घरातच थांबण्याची वेळ आली आहे. पुढचे १५ दिवस अत्यंत महत्वाचे असून संसर्ग टाळणे आवश्यक असल्यामुळे लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.

अनेकजणांनी रेल्वे आणि बस सेवा बंद करण्याचा सल्ला दिला असला तरी अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा सुरु ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रेल्वे आणि बस बंद करण्याचा पर्याय शेवटचा असेल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सरकारी कार्यालयात ५० टक्के कर्मचारी बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता २५ टक्केच कर्मचारी बोलावणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

त्याचबरोबर सरकारने दुकाने आणि आस्थापनं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पण कामगारांचे किमान वेतन बंद करू नका, संकटात माणुसकी महत्वाची असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आस्थापनांच्या मालकांना बजावले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमधील दुकानं बंद ठेवण्यात येणार असली तरी औषधे, अन्नधान्य, दूध, भाजीपाला अशी अत्यावश्यक गरजेची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Leave a Comment